बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : दुहेरी खुनात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गेल्यावर्षी खंडणीसाठी धमकी देणारा कुख्यात गुंड जयेश पुजारीने बुधवारी न्यायालय आवारात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली. त्यामुळे संतापलेल्या आजूबाजूच्या लोकांनी जयेशची चांगलीच धुलाई केली. पोलिसांनी मध्यस्थी करून त्याची सुटका केली. त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्याआधी त्याच्यावर पाकधार्जिण्या घोषणेबद्दल आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला.
जयेश ऊर्फ जयेशकांत ऊर्फ शाहीर ऊर्फ शाकीर शशिकांत एन. ए. (रा. पुत्तूर, जि. शिमोगा) असे त्याचे पूर्ण नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. दीड वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तसेच सहा वर्षांपूर्वी कर्नाटकचे सहायक पोलिस महासंचालक अलोक कुमार यांना त्याने फोनवरून धमकी दिली होती. १०० कोटी पाठवा; अन्यथा खून करू, अशी धमकी त्याने गडकरींच्या नागपूरमधील कार्यालयात फोन करून दिली होती. जयेश पुजारी हा येथील हिंडलगा कारागृहात दुहेरी खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
२०१८ मध्ये तत्कालीन एडीजीपी अलोक कुमार यांना जयेश पुजारीने कारागृहातून फोन करून खंडणीसाठी व जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी होती. यासाठी त्याला जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात आणण्यात आले. न्यायालय कक्षातून बाहेर पडताच त्याने जोरात पाकिस्तान झिंदाबाद, अशी घोषणा दिली. ते ऐकताच खटल्यानिमित्त आलेले अशील तसेच वकीलही चिडले. त्यांनी जयेशला बेदम मारहाण केली.
हेही वाचा :