बंगळूर : कर्नाटक राज्य सार्वजनिक सेवा, अध्यात्म आणि आधुनिक प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. येथील परिश्रमी जनता राष्ट्रनिर्मितीत आघाडीवर आहे. इथल्या मठांचा सेवाभाव श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
तुमकूरमधील सिद्धगंगा मठाचे डॉ. शिवकुमार महास्वामी यांच्या 119व्या जयंतीनिमित्त आयोजित गुरुवंदना महोत्सवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रपती बोलत होत्या. शिवकुमार स्वामींंच्या गादीचे पूजन केल्यानंतर त्या म्हणाल्या, अध्यात्म, सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रसेवा यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. शिवकुमार स्वामींसारखे महान व्यक्तीमत्त्व समाज आणि राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक असतात. 2019मध्ये त्यांनी देहत्याग केला असला तरी त्यांची आध्यात्मिक ऊर्जा आजही समाजाला दिशा देत आहे. गरीब, वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांनी उभी केलेली सेवाभावाची परंपरा अद्वितीय आहे.
ज्ञानदानाला आपल्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, महिला व बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उद्योगमंत्री एम. बी. पाटील, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, व्ही सोमाण्णा उपस्थित होते.