बेळगुंदी : सीमाभागातील मराठी जनतेला न्याय मिळावा, कन्नडसक्ती हटावी, या मागणीसाठी हुतात्म्यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या. आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची आठवण सीमाभागातील मराठी जनतेने कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मत ता. म. ए. समितीचे नेते मनोज पावशे यांनी व्यक्त केले.
बेळगुंदी (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी 1 जून 1986 च्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पावशे बोलत होते.प्रारंभी हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी तर हुतात्मा स्मारकाचे पूजन मनोज पावशेे, परशराम पाटील यांनी केले. एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अमर रहे, अमर रहे, हुतात्मे अमर रहे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या.
पावशे पुढे म्हणाले, सीमालढा 67 वर्षापासून सुरू आहे. परंतु अद्याप सीमाबांधवांना न्याय मिळत नाही. ही लोकशाहीची एक प्रकारची शोकांतिका आहे. हा भाग महाराष्ट्रात जाईपर्यंत लढा देणे आणि त्यासाठी कार्यरत राहणे हे मराठी माणसांचे कर्तव्य आहे. यावेळी प्रकाश शिरोळकर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.सीमालढ्यात शिवसेना समितीच्या बरोबर आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेने त्याग केला आहे. मराठी भाषिकांनी सीमाप्रश्नाचा सोक्षमोेक्ष लागेपर्यंत एकत्रित राहण्याची गरज आहे. यावेळी अर्जुन चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
राजकुमार बोकडे, रमेश माळवी, ग्रामस्थ कमिटी चेअरमन दयानंद गावडा, आपाजी शिंदे, नामदेव बाचीकर, पुंडलिक सुतार, शिवाजी पाऊसकर, निंगुली चव्हाण, जोतिबा उचगावकर, दिव्या उचगावकर, पै. मारुती शिंदे, अनिल गावडा, सुनील पाटील, महादेव पाटील, प्रल्हाद चिरमुरकर, विलास हुबळीकर, डॉ. व्ही. एम. सातेरी, रवळनाथ हालगेकर, महेश पाऊसकर, रंजना शट्टुप्पा चव्हाण उपस्थित होते. किरण मोटणकर यांनी सूत्रसंचालन केले.