बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अडवणूक करण्याचे फर्मान सोडणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यालाच कलंक लावला आहे, आम्ही त्यांच्याकडे लोकशाही मार्गाने परवानगी मागितलेली असताना आम्हाला न कळवता परस्पर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवून मराठी माणसांचा अपमान केला आहे, याची महाराष्ट्र सरकार दखल घेणार का, असा सवाल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगळे यांनी केला आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तत्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी रविवारी बेळगावातून शेकडो मराठी कार्यकर्ते कोल्हापूरकडे रवाना झाले होते. पण कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी परस्पर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बेळगावातून मराठी माणसांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव करण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार मध्यवर्ती समितीच्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना हत्तरगी नाक्यावर अडवण्यात आले आणि त्यांना एपीएमसी पोलिस ठाण्यात दिवसभर बसवून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवून आणण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानुसार आज सर्वजण अमित शहा यांच्या जाहीर सभेत सहभागी होणार होते. पण कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवून मराठी माणसांची अडवणूक केली. त्याचे पडसाद आता सीमाभागात उमटत आहेत.
मरगाळे म्हणाले, आम्ही कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत निवेदन देण्याची विनंती केली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आम्हाला ही परवानगी आहे की नाही याची माहिती देणे आवश्यक होते. पण त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना आमची अडवणूक करण्याचे आदेश देऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा अपमान केला आहे. गेल्या ७० वर्षांत असा प्रकार कधीही झाला नव्हता, पण यावेळी संगनमताने मराठी माणसांची मुस्कटदाबी करण्यात आली असून, महाराष्ट्र सरकार या प्रकरणी कारवाई करणार आहे की नाही, सीमावासीयांच्या भावनांची दखल घेणार आहे की नाही?