प्रातिनिधिक छायाचित्र Pudhari photo.
बेळगाव

Online Fraud Case | भाडोत्री घराची चौकशी; वृद्धा पडली फशी

हनुमाननगरमधील प्रकार; ऑनलाईन भामट्यांकडून ८८ हजारांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तुमचे घर भाडोत्री हवे आहे, त्याची डिपॉझिटची रक्कम पाठवतो, असे सांगत वृद्धेच्याच बँक खात्यातील ८८,५०० रुपयांची रक्कम ऑनलाईन भामट्यांनी काढून घेतली. हनुमाननगरमध्ये ३१ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या या प्रकरणाची सोमवारी (दि. ३) सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कल्याणी नामक ८१ वर्षीय वृद्धा हनुमाननगरमध्ये राहतात. घर भाड्याने देणे आहे, अशी जाहिरात त्यांनी दिली होती. ही जाहिरात पाहून त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपले नाव अलोकप्रताप सिंग असे सांगितले. घराबाबत चर्चा केल्यानंतर संबंधिताने घराचे फोटो व्हॉट्स ॲप करण्यास सांगितले. त्यानुसार सर्व फोटो पाठवल्यानंतर आपल्या कुटुंबाला तुमचे घर पसंत पडले आहे, असे भामट्याने सांगितले. लवकरच घर भाडोत्री घेतो, असे सांगत त्याने सदर वृद्धेकडून बँक खात्याचा सर्व तपशील मागवून घेतला. आपला अकौंटस् ऑफिसर राजेंद्र शेखावत हा तुम्हाला डिपॉझिटची रक्कम पाठवेल, असेही त्याने सांगितले.

यानंतर या वृद्धेशी राजेंद्र शेखावत हा भामटा संपर्क करू लागला. त्याने एका अनोळखी क्रमांकावरून फोन करत तुमचे फोन-पे, गुगल-पे आहे का, अशी विचारणा केली. यावेळी वृद्धेने दोन्हीही नसल्याचे सांगितले. यानंतर तुमच्या बँक खात्याचा तपशील माझ्या मोबाईलमध्ये फिड करत आहे. तुम्हाला एक ओटीपी येईल, तो सांगा असे सांगितले. विश्वास पटल्याने सदर वृद्धेने समोरच्या भामट्याला ओटीपी क्रमांक सांगितला. तो सांगितल्यानंतर वृद्धेच्या खात्यातून ८८,५०० रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून घेतली. हा सर्व प्रकार ३१ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान घडल्याची फिर्याद या वृद्धेने शहर सीईएन पोलिसांत दिली आहे. त्यानुसार याची पोलिसांनी नोंद करून घेतली असून निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT