बेळगाव : ऑनलाईन फसवणूक करणार्या उत्तर भारतातील टोळीचा स्थानिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून मोठे घबाड हस्तगत करण्याबरोबरच महत्त्वाची कागदपत्रे व यंत्रोपकरणे ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सुमारे 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली असून, लवकरच आणखी काही जणांना अटक करून या टोळीचा पर्दाफाश केला जाणार आहे.
गेल्या महिन्यात बंगळूरमधील संजय पटेल नामक उत्तर भारतीय भामट्याने बेळगावच्या ईस्माईल अत्तार नामक युवकाच्या मदतीने बंगळूरच्या फायनान्स कंपनीला 49 कोटींना फसवले होते. 27 ऑक्टोबरला या दोघांना बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर बेळगाव पोलिसांना अलर्ट करण्यात आले होते. त्यानंतर बेळगाव पोलिसांनाही शोधमोहीम राबवली.
गेल्या अनेक महिन्यांपासून उत्तर भारतीय तरुण भामटे बेळगावात भाडे तत्त्वावर राहून स्थानिक तसेच देशभरातील जनतेची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परदेशात बसून तसेच बंगळूर येथे बसून देशातील अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला आहे. यामध्ये बेळगाव शहरातील काही संशयितांनीही त्यांना माहिती पुरवल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे.
बंगळूरमधील कारवाईनंतर बेळगावातील काही संशयितांची नावे समोर आली होती. या स्थानिकांबरोबरच आता उत्तर भारतातील काही भामटेही गेल्या काही महिन्यांपासून बेळगावात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह उत्तर भारतीयांचा समावेश असलेली मोठी टोळी बेळगावात स्थायिक झाली आहे. सुमारे 50 हून अधिक हे भामटे असल्याचेही सांगितले जाते. हे सर्वजण शहरातील मार्केट, माळमारुती, एपीएमसीसह अन्य ठाणा हद्दीतील विविध उपनगरांमध्ये भाडोत्री घरे घेऊन वास्तव्यास होते. भाडोत्री घरातूनच त्यांचा ऑनलाईन फसवणुकीचा धंदा सुरू होता. टोळीचे कारनामे शहर सीईएनने उघडकीस आणल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बुधवारी रात्री पोलिसांकडून पुरावे जमविणे, पंचनामा करणे असे काम सुरू होते. परंतु, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. पोलिस आयुक्त भूषण बोरसे स्वतः माहिती माध्यमांना देणार असल्याचे समजते.