बंगळूर : निजदचे विधान परिषद सदस्य आणि सराफी टी. श्रवण यांची भामट्यांनी फसवणूक केली आहे. हॉल मार्क सील घालून देण्याचे सांगून श्रवण यांच्याकडून 1.249 किलो ग्रॅम सोने भामट्यांनी लांबवले. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टी. श्रवण यांच्या मालकीचे बसवणगुडी येथे श्री साई गोल्ड पॅलेस नामक सराफी दुकान आहे. सोने विक्री करताना हॉल मार्कचे सील असेल, तर चांगला भाव मिळतो. याबाबत भामट्यांनी 14 जानेवारी रोजी दुकानातील कर्मचार्यांना विश्वासात घेऊन हॉल मार्कसाठी सोने आपल्यासोबत नेले. त्यांनी जाताना नगरतपेठेतील कोनार्क हॉल मार्किंग सेंटर येथील कर्मचारी असल्याचे सांगितले होते. दुसर्या दिवशी 15 रोजी कोनार्क हॉल मार्किंग सेंटरचे मालक भरत चट्टड यांच्याशी संपर्क साधून सोन्याची मागणी करण्यात आली. पण, कर्मचार्यांनी ते सोने चोरल्याची माहिती दिली. त्यानुसार साई गोल्ड पॅलेसच्या बसवणगुडी शाखेच्या व्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार दिली.