Farmer dies in elephant attack
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
तिलारी जंगलातून बेळगावच्या सीमेवरील धामणे परिसरात काही दिवस स्थिरावलेल्या ओमकार हत्तीने दोडामार्गमध्ये जाऊन तेथे एका काजू वेचणाऱ्या शेतकऱ्याचा बळी घेतला. यानंतर लागलीच बेळगाव तालुक्याच्या सीमेवर स्थिरावलेल्या चाळोबा गणेश हत्तीने गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. हत्ती दिवसा शिवारात रात्री बेकीनकेरे, अतिवाड गावच्या वेशीत येत असून शिवारात काम करताना शेतकऱ्यांना, मोठी धास्ती वाटू लागली आहे.
महाराष्ट्र वन हद्दीतून बेकीनकेरे, अतिवाड गावच्या शिवारात प्रवेश केलेला चाळोबा गणेश हत्तीने गेल्या सात दिवसांपासून महिपाळगड (ता.चंदगड) जंगलात स्थिरावला आहे. दिवसा जंगलात तर सायंकाळ होताच बेकिनकेरे तसेच अतिवाड या दोन्ही गावच्या शिवारातून थेट नागरी वस्तीकडे येत आहे.
हुक्केरी व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील जंगलातून थेट कुदनूर मार्गे बेळगाव तालुक्याच्या सीमेवर स्थिरावलेला हत्ती रोज रात्री बेकीनकेरे, अतिवाड, होसूर या गावांच्या शिवारात फेरफटका मारत आहे. अतिवाड या गावाजवळील धरण तसेच जलाशयातील पाण्यावर तो आपली तहान भागवत आहे.
मात्र येता-जाता शेतकऱ्यांच्या ऊस, मका, रताळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. यामुळे या चाळोबा गणेश हत्तीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. वनखात्याने या परिसरात दिवस रात्र गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.
अतिवाड गावच्या शिवाराला लागूनच चंदगड तालुक्यातील महिपाळगड जंगल आहे. या ठिकाणी याच हत्तीने मागील वर्षीही महिनाभर मुक्काम ठोकला होता. त्यावेळीही लाखो रुपयांचे नुकसान केले होते.
गुरुवारी ( दि. 24 ) आणि शुक्रवारी (दि. 25) पहाटे सहा वाजता अतिवाड, बेकिनकेरे गावातील पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना हत्तीचे दर्शन झाले. शनिवारी (दि. 26 ) सकाळी चार वाजता बेकिनकेरे गावाला लागून असलेल्या संदीप भोगण यांच्या एक एकर रताळी क्षेत्रात हत्तीने धुडगूस घातला. 15 ते 20 केळीची झाडे पाडून टाकली आहेत. या शेजारी नागेंद्र भोगण यांची शनिवारी पहाटे पाण्याची प्लास्टिक टाकी फोडून टाकली. त्यांच्या दोन एकर ऊस क्षेत्राचेही नुकसान केले.
अतिवाड फाटा येथील महादेव सुतार यांच्या घराजवळही सलग दोन दिवस या हत्तीने दर्शन दिले आहे. त्यांच्या घराजवळील झाडावरील फणस खाण्यासाठी हत्ती येत आहे. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दिवसा तो जंगलात विश्रांती घेत आहे, तर सायंकाळ होताच जंगलाबाहेर मानवी वस्तीकडे येत असल्याने शेतकऱ्यांनी शिवाराकडे जाणे टाळले आहे. हत्तीच्या रात्रीच्या वेळी होणाऱ्या मुक्त संचारामुळे गाव कोवाड मार्गावर ये-जा करणाऱ्या दुचाकींची संख्या ही कमी झाली आहे.
दैनिक पुढारीतून सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच या परिसरात बेळगावचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर पुरुषोत्तम रावजी, बीट फॉरेस्टर झेलसिंग रजपूत, राहुल बोंगाळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचे पथक भेट देऊन शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
हत्ती अतिवाड व बेकिनकेरे गावच्या शिवारात येत आहे. शिवारातून तो मानवी वस्तीकडे येत आहे. गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस आमच्या घराजवळ हत्तीचे दर्शन झाले. झाडावरील फणस पाडून खात आहे. तसेच आमच्या रताळी पिकात धुडगूस घातल्याने नुकसान होत आहे. आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.महादेव सुतार, शेतकरी, अतिवाड