बेळगाव : माझ्यात आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, पण, काही आयटी सेल आमच्याबाबतीत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे संबंध पहिल्यासारखेच उत्कृष्ट आहेत, अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी गुरुवारी (दि. ११) स्पष्ट केले. ते बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील काँग्रेसमधील नेतृत्वातील बदलाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या अफवांवर मंत्री जारकिहोळी यांनी स्पष्टीकरण देऊन संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, आमच्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी काही आयटी सेल्स खोटा प्रचार करत आहेत. आपल्याला माहित असलेल्या आयटी सेल्सनीच या मुद्द्याला अधिक प्रसिद्धी दिली आहे. मात्र, मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की, आमचे संबंध उत्कृष्ट आहेत आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयावर चर्चा करणे पूर्णपणे अनावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील अहिंद संघटनेच्या नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जारकीहोळी यांनी अहिंद संघटना नेहमीप्रमाणे काम करेल. सिद्धरामय्या यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही संघटना आणि तिचा ध्वज पुढे नेईन. अहिंद श्रेणीमध्ये शेकडो जातींचा समावेश असून त्यांच्या हक्कांसाठी नवीन नेतृत्वाची गरज असल्याचे मत मंत्री जारकिहोळींनी व्यक्त केले.
पदासाठी कोणतीही घाई नाही
केपीसीसी अध्यक्षपद किंवा इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना मंत्री जारकिहोळी म्हणाले, मला सध्या मिळालेल्या पदावर मी समाधानी आहे. काँग्रेस पक्षात संयमाने वाट पाहणे खूप महत्त्वाचे आहे. जे संयम राखतात त्यांना योग्यवेळी सर्व काही मिळते. मी सुद्धा आगामी काळासाठी संयमाने वाट पाहायला तयार आहे, असे त्यांनी नमूद केले.