निपाणी : महाराष्ट्रातील झुलपेवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अखेर चिकोत्रा नदीपात्रात दाखल झाले असून, त्यामुळे कोडणीसह परिसरातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. नदीत पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसाठीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तूर्तास सुटण्यास मदत झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चिकोत्रा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले होते. परिणामी, कोडणी आणि आसपासच्या गावांमधील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली होती. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, तर हाताशी आलेली पिकेही पाण्याअभावी धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून झुलपेवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. परिसरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर झुलपेवाडी प्रकल्पाचे दरवाजे उघडून चिकोत्रा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी महाराष्ट्रातील बेळुंकी बंधाऱ्यातून वाहत कोडणी येथे पोहोचले. नदीपात्रात पाणी दाखल होताच ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी नदीकाठावर मोठी गर्दी केली. अनेकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. नदीला पुन्हा पाणी मिळाल्याने विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही मोठा आधार मिळणार आहे.
विशेष म्हणजे, बुधिहाळ येथील बंधाऱ्याचे बर्गे अद्याप काढण्यात आलेले नसल्याने नदीत आलेले पाणी टिकून राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे पावसाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.