मधुकर पाटील
निपाणी : निपाणीतील दोन युवा साहसीवीर तनवीर शब्बीर देसाई आणि निपाणी रायडर्स क्लबचे आकाश राजेंद्र भोसले यांनी लद्दाखमधील जगातील सर्वाधिक उंच वाहनमार्ग असलेल्या उमलिंगला (१९,०२४ फूट) या खिंडीवर दुचाकीने यशस्वी मोहीम पूर्ण करत निपाणीचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेने घेत सन्मानपत्र प्रदान करून गौरव केला आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी दोघेही २० हून अधिक सहकाऱ्यांसह निपाणीहून लेह-लद्दाख मोहिमेसाठी रवाना झाले होते. अत्यंत प्रतिकूल हवामान, कमी ऑक्सिजन आणि खडतर डोंगररस्त्यांचा सामना करत त्यांनी ४ जुलै रोजी उमलिंगला शिखर दुचाकीवर यशस्वीरीत्या गाठले. जगातील सर्वाधिक उंच वाहनमार्गावर पोहोचण्याचा हा पराक्रम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. या ऐतिहासिक कामगिरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेने घेतली असून, दोघांनाही सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे निपाणीसह संपूर्ण सीमाभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तनवीर देसाई व आकाश भोसले सोशल मीडियावरही लोकप्रिय असून त्याच्या इन्स्टाग्रामवर अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी तयार केलेल्या दोन हजारांहून अधिक व्हिडिओंना लाखो प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला आहे. साहस, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मिळविलेल्या या जागतिक यशाबद्दल दोन्ही युवकांवर निपाणी शहरासह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद...
निपाणीचे दोन युवक तनवीर शब्बीर देसाई आणि आकाश राजेंद्र भोसले यांनी लद्दाखमधील जगातील सर्वाधिक उंच वाहनमार्ग असलेल्या उमलिंगला (१९,०२४ फूट) या खिंडीवर दुचाकीने यशस्वी मोहीम पूर्ण केली. या साहसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेने घेत दोघांनाही सन्मानपत्र प्रदान केले. त्यांच्या या जागतिक यशाबद्दल निपाणीसह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.