निपाणी : जुना वाद, वर्चस्वाची भावना व मोबाईलवर स्टेटस ठेवण्याच्या रागातून युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना जत्राट वेस येथील चांभार गल्ली गणेश मंडळ परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली. अभिषेक अनिल बामणे (वय २६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बसवेश्वर चौक पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे २३ दिवसांतील ही दुसरी खुनाची घटना आहे. ऐन गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या परिसरातच हा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जत्राट वेस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आर.बी.बसरगी यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जत्राटवेस परिसरातील चांभार गल्ली येथील गणेश मंडळाच्या परिसरात अभिषेक बामणे यांचे कुटुंबीय राहत असून त्यांचा चर्मकार व्यवसाय आहे.
दरम्यान अभिषेक याचा एका कुटुंबाशी पूर्वीपासून वाद होता. गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास अभिषेकने दुचाकीवरून गणेश मंडळ परिसरातून कट मारल्याच्या कारणावरून संबंधित कुटुंबासमवेत अभिषेक यांच्यात वाद पुन्हा उफाळून आला. या वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. त्यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेत संशयित तिघांनी अभिषेक याच्यावर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान अभिषेकला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात हलविण्यात असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार मारुती कांबळे, प्रशांत कुदरी, लक्ष्मण कुदरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी एलसीबी पथकाच्या साहाय्याने तपास गतिमान करत अभिषेकचा भाऊ शुभम बामणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार काही वेळातच एका कुटुंबातील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन सीपीआय बी. एस. तळवार यांनी पुढील तपास चालविला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.
२३ दिवसांत दुसरा खून
२६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादच्या दिवशी व्हळेहिटणी (ता. गडहिंग्लज) येथील महंमद खलीफ यांचा शहर पोलिस ठाणे हद्दीतील तवंदी घाटात खून झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री निपाणीत अभिषेक बामणे या युवकाचा खून झाल्याने पोलिस यंत्रणेपुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.