निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी नदी पुलावर रविवारी वाहनधारकांनी पुढे जाण्याच्या प्रयत्नात अस्ताव्यस्त वाहने उभी केल्याने सुमारे सहा तास वाहतूक ठप्प झाली. दरम्यान रात्री नऊ नंतर निपाणी ग्रामीण पोलिसांसह रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत करून दिली.
सलग सुट्टी तसेच विवाह समारंभ असल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून महामार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. दरम्यान रविवारी दुपारी तीन वाजता बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी वेदगंगा नदी पुलाजवळ सध्या पिलर पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे माहित असूनही वन-वे असलेल्या मार्गावर पुढे जाण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनधारकांनी आपली वाहने सुसाट हाकली.
दरम्यान अरुंद जागेत ही वाहने अडकून पडल्याने दु. ३ पासून रा. ९ पर्यंत बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दुतर्फा चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. तवंदी घाटातील काहीजणांनी यादरम्यान बस बंद पडल्याने अनुभवला.
दरम्यान यमगर्णी नदी पुलावर बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक खोळंबल्याचे लक्षात येतात सीपीआय बी. एस. तळवार, ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत धाव घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत करून दिली.