निपाणी : आपण पोलिस आहोत, बस स्थानकावर चोरी झाली आहे, अंगावर दागिने घालून फिरू नका असे सांगत दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी निपाणीत बुक स्टॉल चालविणाऱ्या महिलेला लुटल्याची घटना सोमवारी सकाळी चाटे मार्केट येथील गाडगी बोळ रस्त्यावर घडली. यावेळी सरिता उमेश सगरे (वय ५७) या महिलेच्या गळ्यातील व हातातील चेन व बांगड्या असे एकूण ४.५० लाख रुपये किंमतीचे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. भर बाजारपेठेत घडलेल्या घटनेने खळबळ उडाली.
सरिता सगरे यांचे चाटे मार्केट परिसरात गेल्या ७२ वर्षापासून शारदा बुक स्टॉल आहे. नेहमीप्रमाणे त्या माने प्लॉट येथील घराकडून बुक स्टॉलकडे चालत जात होत्या. गाडगी बोळ रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी भामट्यांनी खोटी बतावणी करत दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगितले. यावेळी सरिता या घाबरून गेल्याने त्यांनी आपले दागिने काढून पिशवीत ठेवले. यावेळी दोघा भामट्यांनी पिशवीतील दागिने घेऊन पोबारा केला. परिसरातील काही नागरिकांनी भामट्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यास यशस्वी ठरले. दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत शोध चालवला आहे.