निपाणी : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पुलाचे काम भरावाऐवजी पिलर पद्धतीने करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता या कामाला गती आली आहे. सीमाभागातील शेतकरी व नागरिकांच्या चिवट लढ्यामुळे हा महत्त्वपूर्ण बदल झाला असून सध्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पिलर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पावसाने दडी मारल्याने कामाला आणखी वेग आला असून येत्या दोन महिन्यांत पश्चिमेकडील बाजूचा सेवा रस्ता दोन लेन आणि मेन कॅरेज तीन लेनचा पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे अवताडे कंपनीचे अधिकारी राज पाटील यांनी सांगितले. पश्चिमेकडील काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक त्या बाजूने वळवून पूर्वेकडील बाजूचे काम हाती घेण्यात येणार आहे.वेदगंगा नदीपासून उत्तरेकडे सुमारे एक हजार फूट (३०० मीटर) अंतरावर पिलर उभारून पूल बांधण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दिले आहेत. या कामासाठी सुमारे ७० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. एका बाजूला १३ पिलर असून संपूर्ण पुलासाठी एकूण ५२ पिलर उभारण्यात येणार आहेत.
महामार्गासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या भरावानंतर पुन्हा १० ते १२ फुटांचा भराव करण्याचे नियोजन होते. मात्र त्यामुळे पुराच्या पाण्याच्या विसर्गाला अडथळा निर्माण होऊन महामार्गाच्या पश्चिमेकडील नदीकाठावरील सुमारे २० गावांतील शेती व वस्त्यांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यानंतर भरावाऐवजी पिलर पुलाचा निर्णय घेण्यात आला. सध्या पश्चिम बाजूच्या पिलर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पिलर उभे झाल्यानंतर येथील भराव हटविण्यात येणार आहे.
वेदगंगा कृती समितीने वेळोवेळी पाठपुरावा करून या कामाला गती मिळवून दिली असून पिलरखालील भरावासंदर्भातील काही त्रुटीही संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. यावेळी के. डी. पाटील, शेखर सावंत, शिवाजी पाटील-बानगे, अजित पाटील, नानासाहेब पाटील, अमोल पाटील, शिवाजी पाटील, विनायक लोहार, सुदीप वाळके, दीपक पाटील आदी उपस्थित होते.