सावंतवाडी/निपाणी : आंबोली- महादेवगड पॉईंट येथे मित्रांसमवेत पर्यटनासाठी आलेला निपाणीतील डॉक्टर तोल जाऊन पडल्याची घटना घडली आहे. डॉ. आयुब सय्यद (वय ४६, रा. जत्राट, ता. निपाणी) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी ५.३० वा. ही घटना घडली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र दाट धुके आणि अंधारामुळे त्यांचा शोध लागला नाही. बुधवारी पुन्हा पोलिस रेस्क्यू ऑपरेशन मोहीम राबविणार आहेत. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी मित्रांसमवेत डॉ. सय्यद हे मंगळवारी आले होते. महादेवगड पॉइंट येथे संध्याकाळी उशिरापर्यंत ते मौजमजा करत असताना बाजूला जाऊन फिरून येतो असे सांगून ते पॉइंटच्या ठिकाणी आले.
संध्याकाळी दाट धुके असल्याने धुक्यात त्यांना पुढील काही दिसले नाही. त्यामुळे तोल जाऊन ते खोल दरीत पडले. उशिरापर्यंत ते परत न आल्याने मित्रांनी त्यांची शोधाशोध केली; मात्र ते कुठेच आढळून आले नाही. यावेळी ते दरीत पडले असावे, असा अंदाज मित्रांनी व्यक्त केला. त्यानंतर शोधाशोध करण्यात आली.
घटनास्थळी पो. निरीक्षक राजेंद्र मकदुम यांनी भेट देत पाहणी केली. आंबोली पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून, संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत. धुके आणि अंधारामुळे मोहीम थांबविण्यात आली.