SIR  
बेळगाव

Nipani Voter Registration: मतदार नोंदणीसाठी पैसे घेऊन फॉर्म?

राजकीय कार्यकर्त्यांकडून एसआयआर फॉर्मचे वाटप; निवडणूक प्रशासनाकडून चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : निपाणी शहरात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) अभियानांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसेच इतर संबंधित अर्ज भरण्यासाठी काही खासगी व्यक्तींकडून शुल्क आकारले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

अनेक ठिकाणी अर्ज भरून देण्यासाठी सुमारे ५० रुपये घेतले जात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर काही भागांत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एसआयआरचे फॉर्म घरोघरी वाटप होत असल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत.

मतदार नोंदणी ही प्रत्येक पात्र नागरिकाचा लोकशाही प्रक्रियेतील मूलभूत हक्क व जबाबदारी आहे. मात्र, अर्ज भरण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः अशिक्षित, ज्येष्ठ नागरिक तसेच ऑनलाइन प्रक्रिया करता न येणाऱ्या व्यक्तींना याचा अधिक फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.

काही खासगी व्यक्तींनी अर्ज भरून देण्याचा व्यवसायच सुरू केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, यासंदर्भात निवडणूक प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, प्रत्यक्षात शुल्क आकारले जात आहे का, याची वस्तुस्थिती प्रशासनाने तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.

मतदार नोंदणीची प्रक्रिया सर्वांसाठी सहज, सुलभ आणि शक्यतो मोफत उपलब्ध व्हावी, यासाठी सबंधित विभागाच्या प्रशासनाने आवश्यक ठिकाणी मदत केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT