Nipani farming news Pudhari
बेळगाव

Nipani farming news: शाळू-कापणी मळणी कामाची झुंबड

समाधानकारक उत्पादन : मजुरीच्या दरात वाढ : निपाणी परिसरातील चित्र

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : निपाणी परिसरात रब्बी हंगामातील शाळू कापणी मळणीच्या कामांना वेग आला आहे. यंदा रब्बीचा हंगामांत ज्वारीसह कडब्याचे चांगले उत्पादन असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सध्याची वाढत असलेली उष्णता आणि मजूर टंचाईमुळे कामे संथ गतीने सुरू आहेत. दरम्यान अवकाळीमुळे शेतकरी ही कामे करून घेण्यासाठी धडपडत आहेत.

परिसरात रब्बी हंगामात भूमिपूजन झाल्यानंतर शाळूची पेरणी केली. सध्या पीक कापणीच्या अवस्थेत असून कणसांची चांगल्या प्रकारे दाणे भरणी झाली आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत चांगला उताराही मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळी घाई उडाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने कामे आवरून घ्यावी लागत आहेत. तसेच पैरा पद्धतीचाही अवलंब केला जात आहे. कारण मजुरीचे दरही वाढले आहेत. दुसरीकडे शेतकरी सकाळी सहा ते 11 यादरम्यान कामे उरकून घेण्याच्या लगबगीत आहेत.

आठ दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शाळू पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे शाळू कापून कणसे खुडण्यासाठी अधिकचा वेळ व मजुरी द्यावी लागत आहे. त्यात काही कणसे जमिनीला लागल्याने त्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे कापणी व मळणीचा हंगाम आणखी 10 ते 20 दिवस सलग सुरू राहण्याची चिन्हे आहेत. यंदा निपाणी परिसरात 1 हजार हेक्टरवर शाळूचे पीक असून नदीकाठ परिसरात शाळूचे पीक चांगले आहे. सध्या ज्वारीचा प्रतिक्विंटल 3500 ते 4000 रुपये दर आहे.

चाऱ्यासही प्रतिपेंडी 20 ते 25 रुपये दर आहे. शाळू कापणी व खुडणीसाठी दिवसाकाठी अडीचशे ते तीनशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. तसेच काही ठिकाणी प्रति व्यक्ती सात किलो ज्वारी द्यावी लागत आहे. तसेच मळणीयंत्र चालकांकडूनही पैशाऐवजी सात किलो ज्वारी घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT