निपाणी : निपाणी शहरात चोरट्यांनी अक्षरक्षः धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा चोरीची घटना घडल्याने पोलिस प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. येथील बसस्थानकाजवळील हेरवाडे कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी मध्यरात्री संजय लाखे यांचे स्क्रॅपचे दुकान फोडून अडीच ते तीन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
घटनेची नोद बसवेश्वर पोलिसांत झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लाखे यांचे बसस्थानकाशेजारी असलेल्या हेरवाडे कॉम्प्लेक्समध्ये भांडी व स्क्रॅपचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री 8 वा. ते दुकान बंद करून घरी गेले होते.
सदर चोरीची घटना दुसर्या मजल्यावर झाली आहे. चोरट्यांनी पलीकडील हॉटेलच्या मागून येऊन कठड्यावरून चढून ग्रील वाकवत दुसर्या मजल्यावर प्रवेश करत फ्रेम उचकटून शटर उघडले.
सदर दुकानातील वस्तू घेऊन चोरटे परत मागील बाजूने जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. तब्बल अडीच ते तीन लाखांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. सदर चोरटे 25 ते 30 वयोगटातील दिसून येत आहेत.