Nipani Police Recovered Mobile Phones
निपाणी : जत्रा, यात्रा, बसस्थानक, आठवडी बाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की तो परत मिळेल, ही आशाच अनेकजण सोडून देतात. मात्र अशा निराश नागरिकांसाठी निपाणी पोलिसांनी आशेचा किरण निर्माण केला आहे.
केंद्र सरकारच्या ‘सीईआयआर’ (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या प्रभावी वापरातून निपाणी पोलिसांनी तब्बल १४ लाख १३ हजार रुपये किंमतीचे ९२ हरवलेले मोबाईल शोधून काढत संबंधित मालकांकडे शुक्रवारी (दि.१०) स्वाधीन केले.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांनी सांगितले की, निपाणी पोलीस सर्कल अंतर्गत येणाऱ्या शहर, ग्रामीण आणि बसवेश्वर चौक या तीन पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षांपासून अलीकडीलच्या तीन महिन्यांत मोबाईल हरवल्याच्या व चोरीच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. यामध्ये जत्रा, यात्रा, आठवडी बाजार, बसस्थानक परिसर अशा ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले होते.
या सर्व तक्रारींच्या आधारे ‘सीईआयआर’ पोर्टलच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. या तपासादरम्यान चोरीस गेलेले मोबाईल काही व्यक्तींनी कमी किमतीत खरेदी करून वापरात ठेवले असल्याचे उघड झाले. पोलिसांनी शिताफीने शोध घेऊन असे ९२ मोबाईल हस्तगत केले. यामध्ये निपाणी शहर पोलीस ठाण्यातील ७०, ग्रामीण पोलीस ठाण्यातील १२ आणि बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातील १० मोबाईलचा समावेश आहे.शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत हे सर्व मोबाईल संबंधित मालकांना परत देण्यात आले. यावेळी मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. यावेळी अनेकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या मोहिमेत सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासह एलसीबी पथकाचे एम. ए. तेरदाळ, यासिन कलावंत, रोहन मदने आणि एस. ए. मुल्ला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, यावेळी बोलताना सीपीआय बी. एस. तळवार म्हणाले की, मोबाईल हरवल्यास व चोरीला गेल्यास घाबरून न जाता त्वरित ‘सीईआयआर’ पोर्टलवर नोंद करावी. तसेच जुना मोबाईल खरेदी करताना अधिकृत पावती आणि आयएमए क्रमांक तपासूनच खरेदी करावे जेणेकरून चोरीला गेलेला अथवा हरवलेला मोबाईल ‘सीईआयआर’ पोर्टलच्या माध्यमातून लवकर मिळून येईल, असेही त्यांनी सांगितले.