निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या वतीने गुरुवार दि. २५ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतील जी+२ सदनिका लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबद्दल हरकत असेल तर ४ जुलैपर्यंत दाखल करावी, असे पत्रक पालिका आयुक्त गणपती पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी येथील दाइंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी+२ सदनिकासाठी अंतिम लाभार्थी यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ३० मेपर्यंत चार हप्ते भरलेल्या लाभार्थ्यांची यादी एकत्र करून ज्येष्ठतेनुसार ही यादी तयार करण्यात आली. १२ जूनपर्यंत १०१२ लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. ९ लाभार्थ्यांनी लेखी हरकत घेऊन पैसे भरले असताना आपले यादीत नाव नसल्याचे सांगितले होते. त्यांचाही या यादीमध्ये समावेश केल्याने १०२१ लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
सदर यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांबद्दल तक्रार असल्यास ४ जुलै सायंकाळी ५.३० पर्यंत पालिकेत लेखी तक्रार दाखल करावी. त्यानंतर सदनिका लॉटरी पद्धतीने देण्याबाबत विचार केला जाईल, असे कळविण्यात आले आहे.