निपाणी : दीपावली सण तोंडावर आला असताना तहसीलदार कार्यालय, निपाणी नगरपालिका प्रशासन व पोलिस खात्याने शहरातील मराठी फलक असलेल्या दुकानांवरील मराठी फलक हटवून कारवाई चालू केल्याने शहरात मंगळवारी व्यापारीवर्गातून खळबळ उडाली. यापूर्वी प्रशासनाने सर्व दुकानदारांना मराठी व कन्नड भाषेतून फलक लावावेत, अशा सूचना केल्या होत्या. या सूचनेची अनेकांनी अंमलबजावणी केली नव्हती.
मंगळवारी अचानक तहसीलदार एम. एन. बळीगार, पालिका आयुक्त दीपक हरदी, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, पालिकेचे पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुडन्नावर, आरोग्य खात्याचे विनायक जाधव, प्रवीण कणगले यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील जुन्या पीबी रोडवर असलेल्या दुकानदारांच्या मराठी फलकांवर करडी नजर टाकून अनेक ठिकाणी फलक हटविले.
शहरात शांतता असताना प्रशासनाने मराठी फलक हटविण्याचा घेतलेला निर्णय शांततेला बाधा आणणारा असल्याची प्रतिक्रिया मराठी भाषिकातून व्यक्त होत आहे. नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांनी दीपावली सण तोंडावर आल्याने फलक हटवण्याचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती केली होती. ज्या दुकानावर कन्नड व मराठी फलक आहेत ते हटवू नयेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मंगळवारी सकाळी ११ पासून दुपारपर्यंत जुन्या पीबी रोडवरील सुमारे ५० दुकानांवरील मराठी फलक काढून टाकण्यात आले.