आकाशातून जाताना दिसलेला सहा हेलिकॉप्टरांचा ताफा 
बेळगाव

Helicopters flying in Nipani sky | निपाणीच्या आकाशात 6 हेलिकॉप्टर्सचा अनोखा ताफा : नागरिकांची उत्‍सुकता ताणली!

पक्षचिन्हासारख्या आकृतीने वेधले नागरिकांचे लक्ष :निपाणी परिसरात उत्सुकतेचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : पुढारी वृत्तसेवा निपाणीसह चिकोडी आणि बेळगाव परिसरातील नागरिकांना रविवारी दुपारी आकाशात एक अनोखे आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. एकाचवेळी सहा हेलिकॉप्टरांचा ताफा विशिष्ट रचनेत उड्डाण करत असल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. हेलिकॉप्टरांच्या या मांडणीमुळे आकाशात एका राजकीय पक्षाच्या चिन्हासारखी आकृती निर्माण झाल्याचा भास होत असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले.

दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा हेलिकॉप्टरांचा ताफा अनेकांच्या नजरेस पडला. आकाशात एकसमान अंतर राखून आणि विशिष्ट उंचीवर उड्डाण करणाऱ्या हेलिकॉप्टरांमुळे जमिनीवरून पाहताना एका पक्षचिन्हासारखी प्रतिमा तयार झाल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेकांनी या दृश्याची तुलना कमळाच्या आकाराशी केली, तर काहींनी याला केवळ योगायोग असल्याचे मत व्यक्त केले.

क्षणात मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये दृश्य कैद

हेलिकॉप्टरांचा आवाज ऐकताच नागरिक घरांच्या गच्च्यांवर, रस्त्यांवर तसेच शेतांमधून बाहेर आले. काही मिनिटेच दिसलेल्या या ताफ्याचे फोटो आणि व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. “एकाचवेळी इतकी हेलिकॉप्टर्स प्रथमच पाहिली”, “आकाशात वेगळाच नजारा पाहायला मिळाला”, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

एकुणच आकाशात अचानक दिसलेल्या सहा हेलिकॉप्टरांच्या या ताफ्याने परिसरातील नागरिकांना काही काळासाठी का होईना, पण आश्चर्याचा आणि कुतूहलाचा अनुभव दिला. दुर्मिळ स्वरूपाच्या या दृश्याची चर्चा दिवसभर शहरासह ग्रामीण भागात रंगलेली पाहायला मिळाली.

ताफ्याबाबत उत्सुकता कायम

या हेलिकॉप्टरांचा ताफा नेमका कोणत्या कारणासाठी जात होता, याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार हा ताफा मुंबईहून बेळगाव बंगळूरच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.काही नागरिकांनी व्हीआयपी दौरा, तर काहींनी विशेष प्रशिक्षण अथवा सराव मोहिमेचा अंदाज व्यक्त केला. मात्र यासंदर्भात कोणत्याही शासकीय अथवा अधिकृत यंत्रणेकडून दुजोरा मिळालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT