निपाणी: देवदर्शन करून घरी परतताना कोडणी येथील भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.मारुती गणू किल्लेदार (वय- ५८) असे मृत झालेल्या भाविकांचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत मारुती हे शेती व्यावसायिक होते.ते १४ मे रोजी मुलगी व पत्नीसह कुटुंबासोबत विविध ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते.
विविध ठिकाणचे दर्शन झाल्यानंतर शेगाव येथून २७ रोजी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. पंढरपूर येथे देवदर्शन करून रात्री भोजन केल्यानंतर सर्वजण खोलीवर झोपी गेले.मात्र गुरुवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना पंढरपुरातील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी डॉक्टरांनी रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा शुक्रवार रात्री मृत्यू झाला.त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा,सून, नातवंडे असा परिवार आहे.