बेळगाव

Nipani News : रस्त्यावर सापडली २ लाखांची पर्स, उघडून पाहिली अन्... दाभाडे बंधूंच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा!

प्रामाणिकपणापुढे बक्षीस ठरले फिके; निपाणीत दाभाडे बंधूंचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकी व प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आप्पाचीवाडी-आडी मार्गावर मंगळवारी आला. रस्त्यावर सापडलेली सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज असलेली पर्स कोगनोळी येथील रहिवासी तथा निपाणी तालुका लँड ट्रिब्युनलचे (भू-न्याय मंडळ) सदस्य योगेश दाभाडे व त्यांचे बंधू संतोष दाभाडे यांनी मूळ मालक असलेल्या शिक्षक दांपत्याला सुपूर्द केली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी यांच्या उपस्थितीत ही पर्स परत करण्यात आली. विशेष म्हणजे, पर्स परत मिळाल्याबद्दल शिक्षकाने देऊ केलेली बक्षिसाची रक्कमही दाभाडे बंधूंनी नम्रपणे नाकारून प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिला.

घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, निपाणी (रामनगर) येथील अनिल दुंडाप्पा जाधव हे अंकली (ता. चिकोडी) येथील शारदादेवी कोरे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी ते पत्नी सुवर्णा यांच्यासमवेत हुपरी येथे नातेवाइकांच्या घरच्या धार्मिक कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात होते. आप्पाचीवाडी फाटा ते आडी मार्गावरून जात असताना दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या सुवर्णा यांच्या हातातील पर्स रस्त्यावर पडली. काही अंतर पुढे गेल्यावर पर्स गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने दुचाकी मागे वळवून रस्त्यावर शोध सुरू केला; मात्र पर्स कुठेच दिसेना, त्यामुळे दोघेही धास्तावले.

दरम्यान, याच मार्गावरील नाथ गॅरेजसमोर काही कामानिमित्त थांबलेल्या योगेश दाभाडे व संतोष दाभाडे यांना रस्त्यावर पडलेली ही पर्स दिसली. त्यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यात एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन हजार रुपयांची रोख रक्कम आणि महागडा मोबाईल असा सुमारे दोन लाखांचा ऐवज आढळला. पर्समधील मोबाईलवरून मूळ मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शिक्षक अनिल जाधव यांनी पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला. हा फोन योगेश दाभाडे यांनी उचलून "तुमची पर्स सुरक्षित सापडली आहे," असे सांगितले; ज्यामुळे जाधव दांपत्याचा जीव भांड्यात पडला.

यानंतर आप्पाचीवाडी फाटा येथे भेटून अनिल जाधव यांनी ओळख पटवली. यावेळी महामार्गावरील आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी यांच्या हस्ते दाभाडे बंधूंनी संपूर्ण ऐवज जाधव दांपत्याकडे सुपूर्द केला.

पैशांपेक्षा नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान देणाऱ्या दाभाडे बंधूंच्या या कृतीचे परिसरातून प्रचंड कौतुक होत आहे.

प्रामाणिकपणापुढे बक्षीसही ठरले फिके!

पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महागडा फोन असा मोठा ऐवज असूनही दाभाडे बंधूंचा पाय थोडाही डळमळला नाही. त्यांनी कसलाही मोह न बाळगता ऐवज संबंधितांपर्यंत पोहोचवला. हरवलेला ऐवज सुखरूप परत मिळाल्याने कृतज्ञतेपोटी शिक्षक अनिल जाधव यांनी बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ केली. मात्र, "आम्ही केवळ कर्तव्य पार पाडले आहे," असे सांगत दाभाडे बंधूंनी ती रक्कम घेण्यास नम्रपणे नकार दिला. त्यांच्या या निस्वार्थी वृत्तीने उपस्थितांची मने जिंकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT