Crime News pudhari photo
बेळगाव

Nipani Murder Case : निपाणीतील खूनप्रकरणाचा उलगडा

दोन सख्ख्या भावांना अटक, अल्पवयीनही ताब्यात : बहिणींशी बोलण्यावरून राग

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : जत्राटवेस येथील चांभार गल्ली गणेश मंडळ परिसरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अभिषेक अनिल बामणे (वय २६) याच्या खूनप्रकरणाचा बसवेश्वर चौक पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात उलगडा केला. बहिणीशी बोलण्‍यावरून राग व आपल्या वडिलांना मारहाण करत असल्याचा गैरसमज झाल्याने खुनाची घटना घडल्‍याचे पोलिस तपासाअंती स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी साईनाथ ऊर्फ शुभम रामनाथ बामणे (वय १९) व विठ्ठल रामनाथ बामणे (वय २०, दोघे रा. चांभार गल्ली, खंडोबा मंदिराजवळ, जत्राटवेस, निपाणी) या सख्‍ख्‍या भावांना रविवारी अटक करण्यात आली. तसेच या घटनेत सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन बालन्यायालयात हजर केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील संशयितांच्‍या चुलत्याच्या मुलींशी अभिषेक व त्याचा भाऊ शुभम बोलत असत. याचा साईनाथला राग होता. त्याने अभिषेक व शुभमला आपल्या बहिणींशी बोलू नका, असे सांगितले होते. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. दरम्यान, गुरुवार दि.१७ रोजी रात्री जत्राटवेस येथील रोहिदास भवनाजवळ गणेशमूर्तीजवळ संशयितांच्‍या बहिणी गौरी खेळण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयितांचे वडील रामनाथ बामणे हे अभिषेक व शुभम यांच्याकडे आपल्‍या मुलांशी का वैर धरता, अशी विचारणा करण्यासाठी गेले.

यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. गोंधळाचा आवाज ऐकून साईनाथ, विठ्ठल व अल्पवयीन मुलगा घटनास्थळी आले. वडिलांना अभिषेक व शुभम मारहाण करत असल्याचा गैरसमज झाल्याने त्यांनी चाकू, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी साईनाथने चाकूने अभिषेकच्या पोटात वार केला. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून २० रोजी साईनाथ व विठ्ठल यांना अटक केली. चौकशीतून घटनेचा उलगडा झाल्यानंतर खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली. दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अल्पवयीन मुलास बाल न्याय मंडळ, बेळगाव यांच्यासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सीपीआय बी. एस. तळवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT