निपाणी : निपाणी नगरपालिकेत एजंटांचा सुळसुळाट वाढला असून आयुक्त कोण, निर्णय कोण देते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. परस्पर अनेक व्यवहार होत असून त्याची बिले पालिकेतून काढली जात आहेत. याची पुसटशी कल्पनाही नगराध्यक्ष व सत्तारूढ गटाला दिली जात नाही. त्यामुळे पालिकेत चाललय तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिका आयुक्त दीपक हरदी यांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे. परंतु पालिकेच्या कारभारावर त्यांचा कोणताही वचक नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. अशोकनगर निपाणी येथील खुल्या जागेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. आयुक्तांनी अचानक कोर्टातून खटला मागे घेऊन या प्रश्नाला वेगळे वळण दिले आहे. कोर्टात 3 जून अशी या खटल्याची तारीख होती. तत्पूर्वी 22 एप्रिल रोजी परस्पर सेटलमेंट करून हा खटला मागे घेतला आहे. असे कोणते कारण होते की हा खटला मागे घेणे आवश्यक वाटले. याची कोणतीही कल्पना त्यांनी पालिकेच्या सभागृहाला दिलेली नाही.
शहरातील अनेक जागांच्या घरफाळा प्रश्नावर एजंट निर्णय घेत आहेत. पालिका आयुक्त मूग गिळून गप्प बसलेले असतात. परस्पर पालिका आयुक्तांना भेटताच येत नाही. काही एजंट बारा तास पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये बसून असतात. त्यांना पायबंद का घातला जात नाही, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
पालिकेच्या अधिकार्यांनी वाल्मिकीनगर येथे खासगी कूपनलिका खोदाई केली असताना परस्पर पालिकेकडून या कूपनिकेवर विद्युत मोटार बसवली आहे. पालिकेच्या पट्टणकुडी हद्दीतील कचरा डेपोमध्ये 60 एचपी क्षमतेचा जनरेटर खरेदी करण्यात आला आहे. याची कोणतीही कल्पना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सभापतींना देण्यात आलेले नाही. पालिकेने मिनी जेसीबी खरेदी केला आहे त्याचीही कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे सत्तारूढ गट व पदाधिकार्यांना विश्वासात न घेताच परस्पर अनेक कारभार केले जात आहेत.
पालिका सभागृह नावालाच आहे. सर्व कारभार अधिकारी वर्गांकडून सुरू आहे. नागरिकांच्या करासाठी, उतारे नोंद करण्यासाठी मोठी चिरमिरी घेतली जात आहे. बांधकाम परवाना एक असतो व बांधकाम होते दुसरेच असा प्रकारही शहरात सुरू आहे. याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. बांधकामात पार्किंग सोडले जात नाही. बांधकाम करणार्या नागरिकांना विनामीटरचे नळ कनेक्शन दिले जात आहे. घरांचे बांधकाम होऊन अनेक महिने झाले तरी नळांना मीटर बसलेले नाही. सामान्य नागरिकांकडून मात्र सक्तीने घरफाळा व पाणीपट्टी वसुली केली जाते. बड्या लोकांकडून मात्र चिरीमिरी घेऊन प्रकरणे मिटवली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पालिकेच्या मस्टरवर सही न करताच अनेक कर्मचारी गैरहजर राहतात व नंतर येऊन मस्टरवर सही केली जाते. त्यांची गैरहजेरी कोणीही मांडत नाही असा प्रकारही सुरू आहे. याबाबत ज्येष्ठ नगरसेवकांनी काही दिवस मस्टरची पाहणी केल्यावर ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा प्रकार पालिकेत सुरू आहे. या व अशा अनेक प्रश्नांकडे पालिकेतील सत्तारूढ व विरोधी गटाचे दुर्लक्ष आहे. या अधिकार्यांना कोणताही जाब विचारला जात नाही त्यांच्यावर कोणतीही जरब नसल्याचा आरोप होत आहे.