निपाणी : पुढारी वृत्तसेवा निपाणी-शिरगुपी रोडवर गवत वाहतूक ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने सुमारे लाखांचे नुकसान झाले.या आगीत संपूर्ण गवत जळून खाक होऊन ट्रकचा काही भाग जळाला.ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. घटनेची नोंद अग्निशमन दलात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिरगुपी येथून ट्रकमधून गवत चारा भरून चालक रमेश मडिवाळ रा. खडकलाट हा गवत भरून खडकलाटच्या दिशेने जात होता.दरम्यान हा ट्रक स्वामी लेआउटजवळ आला असता वळणावर रस्त्याच्या वरून गेलेल्या विद्युत तारांचा गवताला स्पर्श झाल्याने आग बघताक्षणीच भडकली.यामध्ये गवताने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले तर ट्रकच्या काही भागाला ही आग लागल्याने नुकसान झाले.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले त्यानुसार घटनास्थळी निरीक्षक एल. एस. नांगनुरे कर्मचारी रमेश खिचडी,सचिन कमते, निंगाप्पा कमते, विशाल पुजारी,डी.एल.कोरे यांनी नागरिकांच्या जेसीबीच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणले.त्यामुळे ट्रकचे होणारे नुकसान टळले. दरम्यान ही आग रात्री उशिरापर्यंत धुमसत राहिल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतवडीतील पिकासह गवतालाही ही आग लागली. दरम्यान घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.