निपाणी : निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार,मतदार संघाच्या हरित क्रांतीचे शिल्पकार व पहिले हॅट्रिकवीर आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१ ) रा.वाळकी (ता. चिकोडी) यांचे मंगळवार दि.१७ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या निधनामुळे निपाणी तालुक्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार दि.१८ रोजी दुपारी मूळगावी वाळकी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गेल्या तीन महिन्यापूर्वी त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात मानेसह पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली होती.या दरम्यान त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची तब्येत खालावली होती.त्यामुळे त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई. रुग्णालयात गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांचा उपचारासाठी अल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
२५ नोव्हेंबर १९५५ साली त्यांचा वाळकी येथील शिक्षक दांपत्याच्या पोटी जन्म झाला.त्यांनी आपले प्राथमिक व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला.त्यांनी कणगला जि.प.कार्यक्षेत्रातून पहिल्यांदा निवडणूक लढवत त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरूवात केली होती.या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी सलग १९९९,२००४ व २००८ या सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या. आमदारकीच्या काळात त्यांनी महत्त्वाकांक्षी असलेला काळमावाडी आंतरराज्य पाणी करार पूर्ण करून वेदगंगा नदीला बारमाही पाणी उपलब्ध करून देत निपाणी भागात हरितक्रांतीचे स्वप्न साकार केले.
निपाणी मतदारसंघाचे अस्तित्व राखण्यासाठी त्यांनी कुलदीप सिंह आयोगासमोर आपली भक्कमपणे बाजू मांडत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबरोबरच निपाणी तालुका निर्मितीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.तसेच कराड-बेळगाव रेल्वे मार्गासाठी केंद्राकडे सातत्याने मागणी लावून धरली. याशिवाय निपाणी शहरासह मतदार संघातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी अनेक योजना राबवल्या. तसेच निपाणी मतदार संघात विकास कामांची गंगा आणली.
तसेच आमदारकीच्या काळात सभागृहात मतदार संघाच्या हिताच्या दृष्टीचे अनेक प्रश्न मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यात तंबाखू वरील व्हॅट रद्द करून उत्पादकांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.दरम्यान एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.यात निपाणी मतदारसंघातून त्यांना तब्बल ३० हजारांचे मताधिक्य त्यांनी मिळवुन दिले होते.
एक मराठा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिले जात होते.विशेष म्हणजे कर्नाटकसह महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.त्यांच्या पश्चात मुलगा मुलगा सुजय,सून उमा,नातू राघवेंद्र,नात संस्कृती,मुलगी सुप्रिया,जावई दत्तकुमार यांच्यासह दोन भाऊ,भावजय,तीन बहिणी, पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान आज बुधवार दि. १८ रोजी सकाळी १० वा. म्युन्सिपल हायस्कूल ते जत्राट वेसपर्यंत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळगावी वाळकी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.