निपाणी : पोलीस, शासकीय अधिकारी, पत्रकार, माजी सैनिक, कंत्राटदार, किराणा, मोबाईल दुकाने यांच्यानंतर आता चोरट्यांनी निपाणी शहर व उपनगरात एका मागोमाग एक बंद घरे फोडण्याचा सपाटाच लावला असून सोमवारी शहराबाहेरील बिरोबा माळ परिसरातील रहिवासी उद्योजक सुनीलकुमार यशवंत वडगावे यांच्या मालकीचा 'गंगाई निवास' हा बंद बंगला भरदिवसा फोडून चोरट्यांनी सुमारे १८ तोळे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम १५ हजार असा एकूण सुमारे २४ लाखांचा ऐवज लांबवून तिजोरीचा ड्राॅव्हर घेऊनच दुचाकीवरून पोबारा केला.
विशेष म्हणजे यावेळी चोरट्यांना मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांची चाहूल लागल्याने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा चोरट्यांनी हातात कोयता दाखवीत दहशत माजवीत दुचाकीवरून धूम ठोकली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवीत या प्रकरणाचा तपास चालविला आहे. विशेष म्हणजे आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. आतापर्यंत चोरट्यांनी एकुण चार घरफोड्या करून ४५ तोळे सोने लांबविल्याने तपास यंत्रणेची झोप उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, उद्योजक सुनीलकुमार वडगावे हे मूळचे नजीकच्या यरनाळ येथील रहिवासी आहेत. ते गेल्या काही वर्षापासून बिरोबा माळ परिसरातील व्यायाम शाळेच्या मैदानाशेजारी बंगला बांधून राहावयास आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी वडगावे हे आपल्या बंगल्याला कुलूप लावून पत्नी पुष्पांजली, आई सुमन यांना कारमधून घेऊन बँकेच्या कामासाठी शहरात गेले होते. ते बँकेत येताच अवघ्या १५ मिनिटात त्यांना शेजाऱ्यांचा तुमच्या घरी चोरी झाल्याचा फोन आला. त्यामुळे वडगावे हे पूर्णपणे भांबावून जात त्यांनी बंगल्याकडे धाव घेतली. यावेळी चोरट्यांनी वडगावे यांच्या बंगल्यासमोर असलेल्या गेटवरून उडी खात आतमध्ये प्रवेश करीत पुढील दाराचे कुलूप लोखंडी पारेच्या साह्याने उचकटून आतमध्ये प्रवेश केला.यावेळी आत रूममधील असलेली तिजोरी फोडून चोरट्यांनी तिजोरीच्या ड्रॉवर मधील असलेला ऐवज व रोकड पाहून ड्रॉवर हातात घेत दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी चोरट्यांना बंगालात समोरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांचा सुगावा लागला. त्यामुळे चोरट्यांनी वडगावे यांच्या वरच्या मजल्यावर न जाता बंगल्या बाहेर येऊन पाहणी केली.यावेळी नागरिक आपल्याला पकडणार हे लक्षात येताच काही अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या एका साथीदारा समवेत तिघेजण हातात कोयता घेत पसार झाले. यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीची रिक्षाला व रिक्षाची दुसऱ्या दुचाकीस्वाराला धडक बसल्याने एकजण खाली कोसळल्याने जखमी झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, एलसीबी पथकाचे शेखर असोदे, शिवानंद सारवाड, उमेश माळगे, हवलदार मंजुनाथ कल्याणी, पी. एम. घस्ती यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने बेळगाव येथील ठसे तज्ञांसह श्वानपथकास पाचारण केले. यावेळी श्वान सदाशिव गुरव यांच्या दुकानापर्यंत जाऊन गुटमळले. यावेळी चोरट्यांनी दुचाकीवरून घेऊन गेलेल्या ड्रॉवरमधून ३ तोळ्याचा लक्ष्मी हार, ३ तोळ्याची मोहन माळ, ३ तोळ्याचे गंठण, ३ तोळ्याच्या पाटल्या, रिंग जोड लक्ष्मी हार, सोन्याची ५ ग्राम तर चांदीची नाणी शिवाय चांदीची लक्ष्मी व गणेशमूर्ती रोख रक्कम १५ हजार असा ऐवज व रोकड लांबविल्याचे दिसून आले.त्यानुसार रात्री उशिरा वडगावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा पुढील तपास चालवला आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. आत्तापर्यंत चोरट्यांनी अष्टविनायक नगर व पंतनगर येथे तीन घरे व सोमवारी वडगावे यांचे अशी चार घरे फोडून ४५ तोळे सोने व रोकड लांबविले असून सोमवारी वडगावे यांच्या घरातून वरील ऐवज लांबविल्याने तपास यंत्रणेची झोप उडाली आहे.
दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निपाणी पोलिसांनी चोरट्यांचा माग शोधण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.प्राथमिक अंदाजानुसार दुचाकीवरून कोयत्याची दहशत दाखवत बुरखा बांधून आलेले तिघे चोरटे हे कोल्हापूर जिल्हा परिसरातील असावेत असा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करून या प्रकरणाचा तपास गतीने चालवला आहे.leopard
विशेष म्हणजे गत आठवड्यात मंगळवारी अष्टविनायक नगर येथील रहिवासी माजी सैनिक राजू घाटगे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी गेटचे कुलूप न तोडता उडी मारूनच आतमध्ये प्रवेश करीत लोखंडी पारेचा वापर करून कुलूप उचकटून आतमध्ये प्रवेश करून २२ तोळे सोने लुटले होते.अशाच प्रकारे चोरट्यांनी सोमवारी वडगावे यांच्या बंगल्यासमोर असलेल्या गेटवरून उडी घेत पुढील दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.त्यामुळे घरफोडी करण्याची ही चोरट्यांची नवीन पद्धत असल्याचे तपास यंत्रणेला सर्व ते बारकावे शोधण्याचे काम चालवले आहे.
सुनील कुमार वडगावे हे बँकेच्या कामासाठी आपल्या पत्नी समवेत जाणार होते.मात्र त्यांच्या अचानकपणे मनात आले.आणि त्यांनी आपल्या आईसह तिघांनी मिळून बँकेच्या कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला जर का वडगावे हे आईला न घेता पत्नी समवेत बँकेत गेले असते तर चोरट्यांकडून या घटनेदरम्यान त्यांच्या वृद्ध आईला धक्काबुक्की होऊन गंभीर घटना घडली असती.मात्र सुनीलकुमार यांनी तिघांनी मिळून बँके जाण्याचा निर्णय घेतल्याने गंभीर घटना ठळली.