निपाणी : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर व श्रीक्षेत्र आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य बेळगाव येथील दोघा चोरट्यांना निपाणी पोलिसांनी अटक केली. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) व जोतिबा यल्लाप्पा धामणीकर (वय २३ रा. दोघेही अगसगा ता. जि. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत त्यांच्याकडून १ लाख, १० हजार रुपयांच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.ही कारवाई विशेष गस्त पथकाने केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गवाणी क्रॉस येथे बुधवारी सायंकाळी सीपीआय बी. एस.तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक उपनिरीक्षका एस.एस.नरसपन्नावर, एम.जी.मुजावर, संजय काडगौडर, विनोद कंग्राळकर, उमेश माळगे, बसवराज नेर्ली हे गस्त घालत असताना सोमनाथ मेणसे हा निपाणीहून बेळगावच्या दिशेने दुचाकी ढकलत नेऊन जात असल्याचे दिसून आले.
त्यानुसार संशयावरून गस्त पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपण दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शिवाय आपला मित्र जोतिबा धामणीकर यांच्या मदतीने आणखी दोन दुचाकी कोल्हापूर व श्रीक्षेत्र आदमापूर येथून चोरल्याचे सांगितले. त्यानुसार तपास पथकाने दोघांकडून १ लाख, १० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त त्यांच्यावर चोरीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी सोमनाथ मेणसे हा मेकॅनिकल असून जोतिबा धामणीकर कामगार म्हणून परिचित आहे पुढील तपास उपनिरीक्षिका एस. एस. नरसपन्नावर या करीत आहेत.