निपाणी : निपाणी शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी आता पान शॉपसह दारूच्या दुकानाला (वाईन्स) लक्ष्य केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील 'निपाणी मेडिकल'समोरील ओंकार पान शॉप आणि मुरगूड रोडवरील भुयारी मार्गाजवळ असलेल्या विशाल वाईन्समध्ये गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. या दोन्ही ठिकाणांहून चोरट्याने रोख रक्कम लांबवली असून, चोरीसाठी आणलेली हत्यारे टाकून त्याने पलायन केले. या घटनेमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
ओंकार पान शॉप हे सोमनाथ शिंपुकडे बंधू यांच्या मालकीचे असून, विशाल वाईन्सचे मालक शिरीष कमते आहेत. तोंडाला मास्क बांधलेला आणि उंच, धिप्पाड बांध्याचा एकटाच चोरटा मध्यरात्री या दोन्ही ठिकाणी चोरी करताना दिसून आला. चोरीदरम्यान दुकानातील साहित्य विस्कटण्यात आले. पान शॉपमधील सीसीटीव्ही/कॅमेऱ्यात चोरट्याची हालचाल दिसल्यानंतर काही युवकांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी चोरट्याने सोबत आणलेली हत्यारे पान शॉपच्या छतावर टाकून तेथून पळ काढला.
दोन दिवसांपूर्वीच शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल परिसरातील विलास माळी यांच्या सराफ दुकानात चोरीची घटना घडली होती. या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे कैद झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता पान शॉप आणि वाईन्स दुकानात चोरी झाल्याने व्यापारी वर्ग हादरला आहे. शहरात सलग चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच्या घटनेतील चोरट्यांचा शोध सुरू असतानाच या नव्या चोऱ्यांमुळे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्याने टाकून दिलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळातच शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. रात्रीच्या वेळी दुकानांच्या सुरक्षेबाबत व्यापाऱ्यांची चिंता वाढली असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
सलग चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
"निपाणी शहरात दोन दिवसांपूर्वी सराफ दुकान फोडल्याची घटना घडली. या घटनेचा तपास सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री पुन्हा पान शॉप आणि वाईन्स दुकानात चोरी झाली. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे सराफ दुकानातील चोरीचे गूढ कायम असताना, दुसरीकडे चोरट्यांनी पुन्हा दोन ठिकाणी हात साफ केला. चोरटे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असतानाही त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश का येत आहे? रात्रीची गस्त नेमकी कुठे असते? व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची सुरक्षा कोण करणार? असे सवाल उपस्थित होत आहेत. सलग घटनांमुळे व्यापारी धास्तावले असून पोलिसांनी केवळ घटनास्थळी पाहणी करण्यापलीकडे जाऊन चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे आणि रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी."
— अरुण खडके, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, निपाणी