shooting case Pudhari Photo
बेळगाव

Nipani Crime : तवंदी घाटातील गोळीबाराचा उलगडा; स्क्रॅप टेंडरच्या वादातूनच घटना

आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी; गावठी पिस्तूल, काडतुसे व कारसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : तवंदी घाट परिसरातील हॉटेल व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणाचा निपाणी पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत उलगडा केला असून स्क्रॅप व्यवसायातील टेंडर आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातूनच ही घटना घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरमान आरिफ मोमीन (वय ३२, रा. अशोकनगर, भाग्यश्री कॉलनी, इचलकरंजी) याला अटक करून बेळगावच्या हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि कार असा सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील स्क्रॅप टेंडर व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती.मात्र ती ऐनवेळी रद्द झाल्याने संबंधित बैठक तवंदी घाट परिसरातील हॉटेल व्हाईट हाऊसजवळ शनिवारी (दि. २०) घेण्यात आली. बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये टेंडर संदर्भातील मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला.

वाद तीव्र झाल्यानंतर अरमान मोमीन याने आपल्या जवळील गावठी पिस्तूल काढून गोळीबार केला. यावेळी शुकराज घाटगे यांच्याकडे काम करणारा सुरेश कलाप्पा खेत्री (वय ४२, रा. ताकारी, ता. वाळवा, जि. सांगली) हे प्रसंगावधान राखून खाली वाकल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आरोपीने दुसऱ्यांदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र खेत्री यांनी जवळील काठीने त्याच्या हातावर वार केल्याने गोळीचा नेम चुकून ती भिंतीवर आदळली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.या बैठकीस स्क्रॅप व्यावसायिक शुकराज पांडुरंग घाटगे व त्यांचा मुलगा हर्षवर्धन घाटगे हेही उपस्थित होते.

घटनेनंतर सुरेश खेत्री यांनी निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. जी. बसर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार एम. ए. तेरदाळ, राजू दिवटे, शेखर असोदे आदींच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान अरमान मोमीनसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने अरमानला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

दरम्यान चौकशीत आरोपीसोबत प्रवास करणाऱ्या दोन्ही साथीदारांना त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय दूर झाला.सखोल तपासानंतर अरमान मोमीनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. या संवेदनशील प्रकरणाचा जलद आणि प्रभावी तपास करून आरोपीला अटक करण्यात यश आल्याबद्दल बेळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने निपाणी पोलिस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

टेंडरमध्ये वाढीव बोलीवरून पेटला वाद..

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान अरमान मोमीन याने शुकराज घाटगे यांच्या गटाला टेंडर प्रक्रियेत वाढीव रकमेची बोली लावू नये, असा इशारा दिला होता. यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, आरोपी सिगरेट ओढत असल्याने सुरेश खेत्री यांनी त्याला धूर इतरांच्या दिशेने सोडू नकोस, असे सांगितले. याचवेळी संतापलेल्या अरमानने पिस्तूल काढून गोळीबार केला. मात्र पोलिसांनी केवळ तात्कालिक कारणावर न थांबता सखोल तपास केला असता, स्क्रॅप टेंडर आणि आर्थिक व्यवहारातील वाद हेच या गोळीबारामागील मूळ कारण असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT