निपाणी : निपाणी शहरात नुकतेच कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन' (एएनपीआर) कॅमेऱ्यांनी पहिल्याच मोठ्या कारवाईत आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे.
मुरगूड रोडवरील एआय कॅमेऱ्यात एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनमालकाविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात जेएमएफसी न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत वाहनमालक तथा मुलाची आई मनीषा गोपाळ लोहार (वय ४४, रा. निपाणी) यांना तब्बल २५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. निपाणीतील आधुनिक एआय कॅमेऱ्यांच्या आधारे झालेली ही पहिलीच मोठी दंडात्मक कारवाई ठरली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने प्रमुख दहा चौकांमध्ये अत्याधुनिक एएनपीआर कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अशाच एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये अल्पवयीन मुलगा रस्त्यावरून दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक पोलिसांनी या फुटेजची दखल घेत मोटार वाहन कायद्यानुसार थेट वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले असता, न्यायालयाने पालकांच्या निष्काळजीपणावर ओढलेले ताशेरे आणि सुनावलेला हा मोठा दंड शहरातील इतर पालकांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. या कारवाईमुळे शहरात एआय कॅमेरे पूर्णपणे सक्रिय झाले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, 'दै. पुढारी'ने निपाणीतील प्रमुख चौकांमध्ये एआय कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याचे वृत्त सोमवार, ६ जुलै रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मुरगूड रोडवरील कॅमेऱ्याने अल्पवयीन दुचाकीस्वाराला टिपत ही पहिली मोठी कारवाई घडवून आणली. त्यामुळे पुढारीच्या वृत्तावरही शिक्कामोर्तब झाले आहे.
या कारवाईबाबत बोलताना शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी पालकांना कडक इशारा दिला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहनाची चावी देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. शहरात बसवण्यात आलेल्या एआय कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रात्रंदिवस बारीक लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; अन्यथा वाहनमालकांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.