जप्त केलेल्या दुचाकींसमवेत सीपीआय बी. एस. तळवार शेजारी उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी व तपास पथकातील पोलीस कर्मचारी.  
बेळगाव

Nipani Crime | एमआयडीसी कामगाराने चोरल्या ८ लाखांच्या दुचाकी!

माणकापुरचा आंतरराज्य सराईत गजाआड : १६ दुचाकी जप्त ; निपाणी ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : नजीकच्या कोडणी येथे एका दुध डेअरीत काम करणाऱ्या कामगाराची दुचाकी चोरून त्याच दुचाकीवरून गावोगावी रात्री-अपरात्री फेरफटका मारीत असे. त्‍याने गेल्या 18 महिन्यात तब्बल १६ दुचाकी चोरणाऱ्या माणकापूर (ता. निपाणी) येथील व कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या नागेश तानाजी केंगारे (वय २६) या कामगाराला ग्रामीण पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. यावेळी त्यांने चोरलेल्या ८ लाख रुपये किंमतीच्या १६ दुचाकी जप्त केल्या. केवळ २० दिवसात या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावल्याबद्दल जि. पो. प्रमुख के. रामराजन यांनी ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोडणी येथील दूध डेअरी कामगार अजित श्रीधर कौलवकर हा दि. १५ मार्च रोजी हालशुगर कारखाना स्थळावर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी कॅम्पसबाहेर दुचाकी पार्क करून आतमध्ये गेला होता.दरम्यान कृषी प्रदर्शन पाहून आल्यानंतर अजित कौलवकर याला मूळ ठिकाणी लावलेली आपली दुचाकी नसल्याचे दिसून आले.त्यानुसार त्याने इतरत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे कौलवकर यांनी याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलिसात दिली होती.

या फिर्यादीच्या आधारे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी एलसीबी पथकाचे हवलदार एम. एफ. नदाफ, रामगोंडा पाटील, रघु मेलगडे, सलीम मुल्ला, मंजुनाथ कल्याणी, परमानंद मारूशेठ,विनोद असोदे यांच्या मदतीने तपास चालविला.

त्यानुसार निपाणी-मुरगुड मार्गावर गायकवाडी जवळ नागेश केंगारे हा चोरलेल्या दुचाकीवरून फिरत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपण इचलकरंजी, शहापूर, कोडणी, रेंदाळ व निपाणी परिसरातील विविध गावातून १६ दुचाकी चोरून त्या यळगुड येथील एका गॅरेज चालक (मेस्त्रीच्या) सहाय्याने मॉडीफाय करून विकण्यासाठी आडी गावाबाहेर एका गॅरेज शेजारी ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी नागेश यांनी चोरलेल्या १६ दुचाकी जप्त करून त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी दिली.

१८ महिन्यात चोरल्या : २० दिवसात सापडल्या..

पोलिसांनी अटक केलेला संशयित नागेश केंगारे हा शिफ्टनुसार कागल एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात काम करीत होता. शिफ्ट नसेल त्यावेळेत तो गावोगावी फिरून गेल्या १८ महिन्यांपासून दुचाकी चोरून विक्री करीत होता. मात्र ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २० दिवसात त्याला ताब्यात घेऊन सुमारे १६ दुचाकी जप्त केल्या. शनिवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांनी चोरीच्या दुचाकी जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरीस गेलेल्या दुचाकी मालकांनी पोलीस स्थानकाला भेट देऊन खातरजमा करण्यासाठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT