निपाणी : शहर व परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक व मिनी मालवाहू टेम्पो वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोघांना बसवेश्वर चौक पोलिसांनी सोमवारी अटक केली. अमित अशोक रावळ (वय १९) व सचिन शंकर साळुंखे (वय २१, दोघेही रा. आंदोलन नगर, निपाणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या २२ बॅटऱ्या व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गेल्या तीन महिन्यांपासून निपाणी शहरासह परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रक व मिनी मालवाहू वाहनांमधून बॅटऱ्या चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयितांवर लक्ष ठेवून तपास सुरू केला होता. १० ऑगस्ट रोजी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी राजू दिवटे व राकेश मदने हे गस्त घालत असताना वरील संशयित दोघांची हालचाल निदर्शनास आली.
पोलिसांनी चौकशी केली असता अमित रावळ व सचिन साळुंखे यांच्यावर संशय बळावला. दरम्यान, त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. यात आरोपींकडून चोरीच्या बॅटऱ्या तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
जप्त केलेल्या बॅटऱ्या विविध कंपन्यांच्या असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ७ हजार रुपये, तर दोन दुचाकींची किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये आहे. ही कारवाई जि. पो. प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जि. पो. प्रमुख आर. बी. बसरगी, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश पवार, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक तौफिक वालिकर, हवालदार राजू दिवटे, राकेश मदने, मारूती कांबळे, प्रशांत कुदरी, लक्ष्मण कुदरी यांच्यासह पोलिस पथकाने केली. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले.
गेल्या तीन महिन्यांपासून निपाणी शहर व परिसरातील रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रक व मिनी मालवाहू वाहनांना लक्ष्य करून बॅटऱ्या चोरीचा प्रकार वरील दोघांकडून सुरू होता. यामध्ये वाहनचालकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत आरोपी बॅटऱ्या काढून नेत होते. चोरी केलेल्या बॅटऱ्यांपैकी काही बॅटऱ्या विक्रीसाठी वापरण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे.