बेळगाव

Nipani Crime : निपाणीत गर्दीचा फायदा घेत ५ लाख लुटण्याचा प्रयत्न; बॅग घट्ट पकडल्याने चोरट्यांचा डाव फसला

पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहरातील अशोकनगर परिसरात गुरुवारी (दि. १३) सकाळी बँकेतून सुमारे पाच लाख रुपये काढून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची (नाव समजू शकले नाही) पैशांची बॅग दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने प्रसंगावधान राखून बॅग घट्ट पकडल्याने चोरट्यांचा डाव फसला. त्यानंतर संशयित दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाले.

शहरात आठवडी बाजारामुळे मोठी गर्दी असतानाही हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अशोकनगर परिसरातील गुंदेशा मेटल मार्टसमोर ही घटना घडली. संबंधित व्यक्ती बँकेतून मोठी रोकड घेऊन जात असल्याची पाळत चोरट्यांनी ठेवली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. संधी साधून दुचाकीवरील दोघांनी अचानक बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅग हातातून न सुटल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला.

या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सीपीआय बी. एस. तळवार, बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. फुटेजमधून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

घटनेनंतर घाबरलेल्या संबंधित व्यक्तीने सुरक्षेच्या दृष्टीने बॅगेतील रक्कम पुन्हा बँकेत जमा केल्याचे समजते. त्यामुळे मोठी रोकड घेऊन प्रवास करताना नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्तींवर चोरटे पाळत ठेवत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेतून पैसे काढल्यानंतर अनावश्यक ठिकाणी न थांबता सुरक्षित ठिकाणी जावे. संशयास्पद व्यक्ती अथवा दुचाकीस्वार पाठलाग करत असल्याचे जाणवल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

"अशोकनगर परिसर नेहमीच नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. अशा ठिकाणी चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणे गंभीर बाब आहे. संबंधित व्यक्तीने प्रसंगावधान राखल्यामुळे चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, घटना घडत असताना नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित होते. केवळ सीसीटीव्ही फुटेज काढून ते प्रसारित करण्यापेक्षा संशयितांना पकडण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक घटनेसाठी केवळ पोलिसांनाच जबाबदार धरणे योग्य नाही."
— बी. एस. तळवार (सीपीआय, निपाणी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT