वाळकी : बेकायदा मिळून आलेल्या तांदळाची मोजदाद करताना आहार निरीक्षका ऐश्वर्या दिवटे शेजारी हनमंत खांडेकर व पोलीस कर्मचारी.  
बेळगाव

Nipani Crime | वाळकी येथे गोदामातील बेकायदा रेशनचा ४ टन तांदूळ जप्त!

चिकोडी अन्न व नागरी पुरवठा खात्याची कारवाई : साठा करण्याऱ्याला नोटीस

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : पुढारी वृत्तसेवा नजीकच्या वाळकी ता. चिकोडी येथे रेशनवर वितरित होणाऱ्या बेकायदा तांदळाचा साठा करून ठेवलेल्या गोदामावर चिकोडी तालुका अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख रुपये किमतीचा ४ टन तांदूळ जप्त केला. यावेळी साठा करणाऱ्या दुंडाप्पा अण्णासो सिद्दनावर (वय ४७ रा. वाळकी) याच्यावर पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वाळकी येथील दुंडाप्पा सिद्दनावर याने गावोगावी फिरून रेशनवर वितरित होणारा तांदूळ कमी दराने खरेदी करून चढ्या दराने विक्री करण्यासाठी त्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती चिकोडी विभागाच्या आहार निरीक्षका ऐश्वर्या दिवटे व हनमंत खांडेकर यांना मिळाली.

त्यानुसार खडकलाट पोलीस ठाण्याच्या प्रभारी उपनिरीक्षका संजीवनी नरसापन्नावर, हवालदार अरुण चौगुला यांच्या मदतीने सापळा रचून आहार व पोलीस खात्याच्या पथकाने सिद्दनावर याच्या गोदामावर छापा टाकला. यावेळी सिद्धनावर यांनी परिसरातील गावागावात फिरून नागरिकांकडून कमी दराने घेऊन ४ टन तांदळाचा साठा केल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने मोजदाद केली असता ५० किलोची ७१ पोती असा एकूण सुमारे १ लाख रुपये किमतीचा तांदूळ जप्त करून दुंडाप्पा याच्यावर कारवाई करून त्याला नोटीस बजावली असल्याची माहिती आहार निरीक्षिका ऐश्वर्या दिवटे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT