Crime News pudhari photo
बेळगाव

Nipani Crime : डोळ्यात चटणी टाकून दोन लाख लुटल्याचा बनाव; एकजण पोलिसांच्या ताब्यात

यमगर्णी नदी पुलाजवळील घटनेने खळबळ; कोगनोळी टोलनाक्यापर्यंत तपास

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : यमगर्णी नदी पुलाजवळ बोलेरो चालकाच्या डोळ्यात चटणी फेकून दोन लाख रुपये लुटल्याची घटना घडल्याचे बुधवारी रात्री ९ च्या सुमारास समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मात्र, प्राथमिक तपासातच हा प्रकार प्रत्यक्ष लुटीचा नसून केवळ पैशांसाठी रचलेला बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी डोळ्यात चटणी टाकून दोन लाख रुपये लुटून नेल्याचा कांगावा बोलेरो चालकाने केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालकाकडून सविस्तर माहिती घेत संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच घटनास्थळापासून थेट कोगनोळी टोलनाक्यापर्यंत तपास मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चालकाच्या जबाबातील विसंगती तपासण्यास सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखवताच हा निव्वळ बनाव असल्याचे उघड झाले असून, संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. आता ते दोन लाख रुपये नेमके कुठे दडवले आहेत, या पैशांचा नेमका व्यवहार काय होता आणि या कटकारस्थानात आणखी कोणाचा हात आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार आणि उपनिरीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कारवाई करत होते. या घटनेमुळे यमगर्णी नदी पूल परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT