निपाणीला मिळणार प्रेशर फिल्टरचे पाणी 
बेळगाव

Nipani Water Supply Project : निपाणीला मिळणार प्रेशर फिल्टरचे पाणी

चाचणी सुरू : 55 लाख खर्चून जवाहरलाल तलावाजवळ उभारणी

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या वतीने सुमारे 55 लाख रुपये खर्चून जवाहरलाल तलाव फिल्टर हाऊसजवळ नवे प्रेशर फिल्टर बसवण्यात आले असून. या फिल्टरमधून रोज एक लाख लिटर पाणी फिल्टर होणार आहे. सध्या या प्रेशर फिल्टरची चाचणी सुरू असल्याची माहिती आणि पुरवठा विभागाचे सर्जेराव चव्हाण यांनी दिली. सदर प्रेशर फिल्टर उघड्यावरच बसवण्यात आले असून, शेड का उभारण्यात आले नाही, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. या कामाची निविदा संजय डोंगरे यांनी घेतली होती. प्रेशर फिल्टर बसवण्यासाठी केवळ फाऊंडेशनचे काम करण्यात आहे.

निपाणी शहर व उपनगराला रोज 12 एमएलडी पाणीपुरवठा करावा लागतो. सध्या पालिकेचे 3 जलशुद्धीकरण घटक कार्यरत आहेत. या जुन्या जलशुद्धीकरण घटकांबरोबर प्रेशर फिल्टरमुळे जादा पाणी फिल्टर होऊन शहर व उपनगराला पुरवठा करता येणे शक्य होणार आहे. अद्याप या प्रेशर फिल्टरला मीटर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे किती वेळेत किती पाणी फिल्टर होते, याची माहिती मिळत नाही. उघड्यावर बसवलेल्या प्रेशर फिल्टरला शेड उभारण्याची मागणी होत आहे. निपाणी शहरास पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहरलाल तलावात गुरुवारी 42 फूट पाणीसाठा होता. वेदगंगा नदीच्या पाण्याचा उपसा जवाहरलाल तलावात सुरू असून शिरगुप्पी येथील तलावाचे पाणीदेखील पिण्यासाठी वापरले जाते. शहर व उपनगराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. फिटर हाऊसजवळील जनरेटर बंद असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यावर पाणी फिल्टर करणे थांबते.

जवाहरलाल तलावाला एक्स्प्रेस वीजलाईन देण्याची मागणी असली तरी महामार्ग प्राधिकरणाने एक्स्प्रेस वीज लाईन नेण्यासाठी टॉवर उभारणीस अद्याप मंजुरी दिलेली नाही. समाधी मठापासून जवाहरलाल तलावापर्यंत एक्स्प्रेस वीज लाईन टाकण्याचा प्रस्ताव असला तरी हायवेमुळे ही एक्स्प्रेस वीजलाईन नेता येणे अशक्य झाले आहे. सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे अशावेळी ही एक्स्प्रेस वीज लाईन जमिनीखालून नेता येते का, हे पाहण्याची गरज आहे.

शहराला अमृत 2 योजनेतून 32 कोटी 83 लाख रुपये मंजूर झाले आहेत. परंतु, हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. एम डी. आर. टाकीला जाणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. ही गळती काढण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. पालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. पावसाळ्यापर्यंत तरी पाणीटंचाई जाणवणार नसल्याने पाणीपुरवठ्यासंबंधी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यात्रा काळात जादा पाणी सोडण्याची मागणी

शहराचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिराची वास्तुशांती, देवीची त्रैवार्षिक यात्रा, महादेव मंदिराचा महाशिवरात्रीनिमित्त रथोत्सव, यात्रा, रेणुका देवीची यात्रा असे विविध कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यात्रा काळात निपाणीकरांना मुबलक पाणी सोडावे. हा पाणीपुरवठा रोज करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT