निपाणी: येथील श्रीरामसेना हिंदूस्थानतर्फे रामनवनिमीत्त रविवारी सांयकाळी जय श्रीराम...च्या जयघोषात श्रीरामनवमी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण निपाणी शहर सजले होते. श्री राम मंदिरापासून चिकोडीचे संपादना महास्वामीजी, समाधिमठाचे प्राणलिंग स्वामीजी, हातकणंगलेच्या माजी खासदार निवेदीता माने, भाकणूककार कृष्णात डोणे, श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष ॲड.निलेश हत्ती यांच्या हस्ते पालखी पूजन व आरती झाल्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रेस सुरूवात झाली.
मिरवणुकीत प्रभू रामचंद्र व हनुमंताची १८ फूट उंचीची मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, कित्तूर चन्नमा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गरूडावर विराजमान झालेले संत तुकाराम महाराज भव्य मूर्तीसह शोभायात्रेला हत्ती, घोड्यासह लाठी-काठी मर्दानी खेळ, सांस्कृतिक चंडीनृत्य, प्रभू रामचंद्रांची रामलीला, पारंपारिक नृत्य, वानर सेना, लक्ष्मण व सीता मातेचा सजीव देखावा, लव्ह जिहाद, नारीशक्ती हत्या यासोबत अनेक सामाजिक संदेश देखावे, त्याचप्रमाणे महापुरुष आणि थोर महिला यांच्या वेशभूषा यांचा समावेश होता. त्यामुळे अवघे शहर राममय झाले होते. जयश्रीरामच्या घोषणांनी अवघे शहर दुमदुमले होते.
यावेळी श्रीरामसेनेचे कार्यकर्ते, समस्त हिंदू बांधवासह आजी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी शोभायात्रेत सहभाग दर्शविला. रात्री उशिरापर्यंत ही शोभायात्रा सुरू होती. शोभायात्रा पाहण्यासाठी निपाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रेसाठी संपूर्ण शहरातून वेंगवेगळ्या रंगात रांगोळी घालून स्वागत करण्यात आले होते. भव्य भगव्या कमानी, डिजीटल फलक, भगव्या पताका, आणि भगव्या झेंड्यासह भगवा पेहरावा परिधान करून सहभागी झालेला युवा कार्यकर्ता शोभायात्रेची शोभा वाढविताना दिसत होता. भगव्या साडी व ड्रेस मधील महिलांची उपस्थिती शोभायात्रेत उत्साह निर्माण करणारी होती. राममंदिरापासून सुरू झालेली ही शोभायात्रा विविध मार्गावरून नेण्यात आली.
यावेळी शोभा यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार, शहरच्या उपनिरीक्षक उमादेवी, खडकलाटच्या अनिता राठोड, बसवेश्वर चौकचे रमेश पोवार, ग्रामीणचे शिवराज नाईकवाडी यांच्यासह चिक्कोडी येथील वाहतूक पोलिस व चिक्कोडी उपविभागातील अधिकारी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.