निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा येथे वेदगंगा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात अमीना अकबर कडगावकर (वय ४८, रा. इंगळी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ही महिला जागीच ठार झाली. तर दुचाकीस्वार मुलगा राज अकबर कडगावकर (वय २६) हा जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार राज कडगावकर हा गेल्या आजरा येथील मदरशामध्ये कामावर आहे. तो आपल्या आई समवेत तेथे राहत होता. मयत अमीना यांना शुगरचा त्रास असल्याने दोघेजण औषध उपचारासाठी दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी आजरा येथून इचलकरंजी येथे गेले होते. उपचार करून अमीना या रात्री दुचाकीवरून आजरा येथे जात होत्या.
दरम्यान, त्यांची दुचाकी सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदी पुलावर एकेरी वाहतूक मार्गावर आली असता दुचाकीस्वार राज याचा ताबा सुटल्याने अमीना या खाली कोसळल्या. याचवेळी मागून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाचे चाक अमीना यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या तर राज हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी राज याला उपचारासाठी सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांना पाचारण केले.
त्यानुसार घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ यांनी भेट देऊन फरार अज्ञात वाहनाचा शोध घेतला. याबाबत मयत अमीना यांची मुलगी आयेशा हिने फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक नायकवडी यांनी चालवला आहे.