बेळगाव

निपाणीत ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडले, व्यावसायिक ठार

बसस्थानकाबाहेरील चिकोडी रोडवरील जासूद कॉम्प्लेक्स समोर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Nipani Accident Tractor Crushes Two Wheeler Businessman Killed

निपाणी : येथील बसस्थानकाबाहेरील चिकोडी रोडवर जासूद कॉम्प्लेक्सनजीक भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संतोष छानराव आंबले (वय ६५, रा.न्यु हुडको कॉलनी, निपाणी) हे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (दि. २४) रात्री आठच्या सुमारास घडला. दरम्यान घटनास्थळी असलेल्या व्यावसायिक व नागरिकांनी अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला काही अंतरावर जाऊन ताब्यात घेतले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत संतोष आंबले हे स्लायडिंग व्यावसायिक होते. त्यांची सुनिता एंटरप्रायजेस ही फर्म निपाणी-मुरगुड रोडला लागून आहे. दरम्यान ते आठच्या सुमारास फर्म बंद करून गावातील घराकडे चिकोडी रोडने जात होते. याचवेळी ऊस खाली करून चिकोडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरची आंबले यांच्या दुचाकीला मागून धडक बसली. यामध्ये आंबले हे ट्रॅक्टरखाली सापडल्याने आंबले यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक व व्यावसायिकांनी ट्रॅक्टर चालकाचा काही अंतरापर्यंत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार प्रशांत कुदरी यांनी घटनास्थळी दाखल होऊन मयताची ओळख पटवली.

याबाबतचे वृत्त समजताच आंबले यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला. दरम्यान रात्री उशिरा अपघातग्रस्त ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक रमेश पवार हे करत आहेत. मयत रमेश यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

वाहतूक कोंडीमुळे अपघात..

धर्मवीर संभाजी चौक ते अशोकनगर क्रॉसपर्यंत दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. या मार्गावर दुचाकी तसेच अनेक वाहनधारक चुकीच्या पद्धतीने त्यांनी वाहने पार्किंग करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातूनच अवजड वाहनासह ऊस वाहतूक वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असते. बुधवारी झालेला हा अपघात केवळ वाहतुक कोंडीमुळे घडल्याने आंबले यांना आपला लाख मोलाचा जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच निपाणी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून या अपघातानंतर आता प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT