अपघातातील मृत वासिम सोलापूरे व बाळू तासिलदार, डावीकडे, तर जखमी अमन गवंडी व सुगराबी तासिलदार उजवीकडे 
बेळगाव

Nipani Accident | भरधाव कारने शेतकऱ्याला उडवले, कारचालकासह शेतकरी ठार!

मृतात निपाणीतील युवकासह खडकेवाड्यातील शेतकऱ्याचा समावेश ; दोघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : निपाणी-मुरगुड मार्गावर खडकेवाडा नदीपुलावर भरधाव कारने रस्त्याने चालत जात असलेल्या पती पत्नीला धडक देऊन उडवल्याने झालेल्या अपघातात पती बाळु बाबालाल तासिलदार (वय ६५, रा. खडकेवाडा ता.कागल) यांच्यासह कारचालक वासीम मोहम्मद सोलापूरे (वय ३८,रा.रोहिणीनगर, निपाणी) हे दोघेजण जागीच ठार झाले. तर बाळू तासिलदार यांच्या पत्नी सुगराबी बाळू तासिलदार (वय ५८) व मयत कारचालक वासिम यांच्या बाजुला बसलेला मित्र अमन आदम गवंडी (वय ३५ रा.भीमनगर, निपाणी) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अमन याच्यावर निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.हा अपघात सोमवारी मध्यरात्री १ च्या सुमारास झाला. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत कारचालक वासिम सोलापुरे व त्यांचा जखमी मित्र अमन हे दोघेजण खडकेवाडा येथील आपले काम आटोपून कारने निपाणीकडे परतत होते. दरम्यान नदीपुलाजवळ त्यांची कार आली असता खडकेवाडा येथील दांम्पत्य बाळू बाबालाल तासिलदार व त्यांच्या पत्नी सुगराबी बाळासो तासिलादार हे दोघेजण रात्री मोहरमचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गलगले रस्त्याला लागून असलेल्या आपल्या शेतातील घराकडे रस्त्याने चालत जात होते.

दरम्यान याचवेळी निपाणीकडे जाणाऱ्या मयत कारचालक वासिम सोलापुरे यांच्या कारची बाळू तासिलदार व सुगराबी तासिलदार या दोघांना मागून जोरात धडक बसली.यामध्ये बाळू हे जवळजवळ २० फुट फरफटत गेल्याने जागीच ठार झाले.तर त्यांच्या पत्नी जखमी झाला.तर यावेळी कार झाडाला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओघळीत( खड्ड्यात ) जाऊन पडल्याने चालक वासिम हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या बाजुला बसलेले मित्र अमन गवंडी हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची भीषणता इतकी होती की घटनास्थळाचे दृश्य हृदयद्रावक होते. यामध्ये बाळू तासिलदार यांचा एक हात व एक पाय धडापासून दहा ते बारा फूटाच्या अंतरावर पडले होते. तर जागेवर रक्ताचा सडा पडला होता. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानेच हा थरारक अपघात झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच खडकेवाडा पोलीस पाटील आप्पा पवार यांनी जखमी व मयताची ओळख पटवीत मुरगुड पोलिसांसह कुटुंबियांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षक क्रांती पाटील यांच्यासह निपाणीचे माजी नगरसेवक शेरू बडेघर,नाविद देसाई,यासीन अत्तार, साहिल सय्यद, तनवीर जमादार, इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अमन सुगराबी यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये अमन याच्यावर निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मयत कारचालक वासिम सोलापुरे हा युवक रियल इस्टेटचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, तीन बहीणी असा परिवार आहे. त्याचे वडील निपाणी नगरपालिकमध्ये अभियंता म्हणून सेवेत होते. गेल्या ३ वर्षापुर्वी ते निवृत्त झाले असून वासिम यांचा लहान भाऊ लंडनमध्ये असून तो आज बुधवारी निपाणी येथे परतणार आहे. दरम्यान वासिम याच्यावर मंगळवारी सायंकाळी निपाणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT