निपाणी : निपाणी-मुरगूड मार्गावर जवाहरलाल तलाव मार्ग वळणानजीक असलेल्या सरस्वती पेट्रोल पंपासमोर स्पीड ब्रेकरवरून दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संकेत दिलीप चव्हाण (वय ३८, रा. तुळशीकाठे, जामसेंड ता. देवगड जि. सिंधुदुर्ग) हा कार व्यावसायिक युवक जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मृत संकेत चव्हाण हा जुन्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. तो आपल्या कुटुंबीयांसमवेत हमीदवाडा (ता. कागल) येथे नातेवाईकांच्याकडे वार्षिक यात्रेसाठी आला होता. दरम्यान मध्यरात्री दोनच्या सुमारास तो हमीदवाडा येथून नातेवाईकांची दुचाकी घेऊन काही कामानिमित्त निपाणीस येत होता. दरम्यान वळणावर असलेला स्पीडब्रेकर न दिसल्याने संकेत याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो जोराने खाली कोसळला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ यांनी भेट देऊन मयत युवकाची ओळख पटवली. त्यानुसार मृत संकेत याचे वडील दिलीप नानासो चव्हाण यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक कार्जोळ यांनी चालवला आहे. मृत संकेत याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.