आडी : अपघातात पलटी झालेले पिक-अप वाहन 
बेळगाव

Nipani Accident | पिक-अप वाहन पलटी झाल्याने आडीतील ११ भक्त जखमी

तिघे गंभीर ; देवदर्शन करून परतताना आप्पाचीवाडीजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : राष्ट्रीय महामार्ग ते आप्पाचीवाडी मार्गावर श्री हालसिद्धनाथ कारी देवस्थान नजीक वळणावर देवदर्शन करून परतणाऱ्या पिक-अप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात आडी (ता.निपाणी) येथील वाहनात असलेल्या एकुण १५ जणांपैकी ११ भक्तगण जखमी झाले. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर व कणेरीमठ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून इतर ९ जणांवर निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास झाला घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पिक-अप चालक अनिल बाळू कुंभार हे (रा.आडी) हे गावातील दिनकर मल्लू खांडेकर, अण्णाप्पा मल्लाप्पा कबुरे, नामदेव मल्लू कुंभार, बाळू खांडेकर, रेखा शिवाजी हरेर, पांडुरंग भीमराव हरेर, बाळू कल्लाप्पा बन्ने, मल्लू भोसले, जोतिबा कुंभार अशा दहा जणांना घेऊन तारळे, खुर्द (ता. राधानगर जि. कोल्हापूर) येथे यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी गेले होते.

हे सर्वजण देवदर्शन करून आपल्या मूळगावी परतत होते दरम्यान त्यांचे वाहन आप्पाचीवाडी महामार्गावरील कारी देवस्थाननजीक वळणावर आले असता चालक अनिल कुंभार यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झाले यामध्ये वाहनात मागे बसलेले सर्वजण एकमेकांवर आदळल्याने शिवाय काहीजण वाहनाखाली सापडल्याने यामध्ये चालकासह ११ जण जखमी झाले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, ठाणे अंमलदार संजय हिरेमठ, बीट हवलदार विनोद असोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने निपाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान निंगाप्पा बन्ने, पांडुरंग हरेर, बाळू बन्ने यांची प्रकृती गंभीर राहिल्याने निंगाप्पा व बाळू या दोघांना कोल्हापूर तर पांडुरंग यांना कणेरीमठ येथील सिद्धगिरी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. याबाबत जखमी दिनकर खांडेकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक नाईकवाडी यांनी चालवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT