मृत अशोक कांबळे 
बेळगाव

Nipani News | मॉर्निंग वॉकला निघालेल्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने चिरडले!

निपाणीजवळील शाहूनगर वळणाजवळ भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने गवंडी व्यवसायिकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन चिरडल्याची भीषण घटना रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास निपाणीजवळील शाहूनगर वळणावर लोहार गॅरेजसमोर घडली. या अपघातात अशोक बाळू कांबळे (वय ५८ रा. जुने संभाजी नगर,निपाणी) या गवंडी व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला.

अशोक कांबळे हे दररोज मॉर्निंग वॉकसाठी मुरगुड व कोडणी रोड परिसरात जात होते. रविवारी सकाळी ते मुरगुड भुयारी मार्गाच्या सर्व्हिस रोडवरून महामार्गावरून पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी पोलिसांना पाचारण केले.यावेळी उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी भेट देऊन रितसर पंचनामा करून जवळ असलेल्या मोबाईलवरुन मृताची ओळख पटविली.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना घटनास्थळी पाचारण केले. कांबळे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी हिट अॅन्ड रन कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.याबाबत मयत कांबळे यांचा मुलगा अजित कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. मयत कांबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाईलमुळे पटली मृताची ओळख..

अपघातानंतर मृताची अवस्था गंभीर असल्याने तत्काळ ओळख पटविणे कठीण झाले होते. मात्र, त्यांच्या खिशात आढळलेल्या मोबाईलवरून उपनिरीक्षक कार्जोळ यांनी मयत अशोक बाळू कांबळे यांची ओळख पटविली. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT