निपाणी : इचलकरंजी येथील एकाच कुटुंबातील १२ भाविक संकेश्वर येथील निलगार गणपतीचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या मिनी बसला तवंदी घाटातील उतारावर रविवारी दुपारी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बसमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर बसमधील सर्व १२ भाविकांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण मिनी बसला वेढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.
इचलकरंजी येथील वाहन चालक-मालक विनायक मोहन साळुंखे हे ही मिनी बस चालवत होते. कुटुंबीयांसह निलगार गणपतीचे दर्शन घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. तवंदी घाटात आल्यानंतर अचानक शॉर्टसर्किट होऊन वाहनाला आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागताच चालक साळुंखे यांनी प्रसंगावधान राखत बस बाजूला घेऊन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सर्वजण खाली उतरताच काही क्षणांत बसने भीषण पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक गंगापा पुजेरी यांनी निपाणी व संकेश्वर अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान, रस्ते देखभाल करणाऱ्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे हेही सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाचे निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मनोहर बिलामारी, सी. एस. पम्मार, सचिन कट्टी व रवी हेगडे यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले; मात्र तोपर्यंत मिनी बसचे मोठे नुकसान झाले होते.
मिनी बसमधून धूर निघत असल्याचे दिसताच चालक विनायक साळुंखे यांनी तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि सर्व १२ जणांना बाहेर काढले. सर्व भाविक खाली उतरताच वाहनाने क्षणात रौद्ररूप धारण केले. चालकाच्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असून, एकाच कुटुंबातील सर्व भाविक सुखरूप बचावले.