निपाणी : नजीकच्या कोडणी (ता. निपाणी) येथे घरातील साडीच्या झोपाळ्यावर झोके घेत असताना गळफास लागून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी घडली. शुभ्रा युवराज राऊत-पाटील (वय १४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने कोडणी परिसरात शोककळा पसरली आहे.
शुभ्रा ही श्रीपेवाडी येथील श्री जी. एम. संकपाळ हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. बुधवारी मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केल्याने ती आपल्या दोन लहान बहिणींसह घरी होती. तिची आई शेतमजुरीसाठी, तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. आजी पंढरपूरला गेल्याने आजोबा घरी होते. दिवसभर शुभ्राने शिक्षकांना एनआयआर (किंवा संबंधित शैक्षणिक फॉर्म) फॉर्म भरण्याच्या कामात मदत केली होती.
सायंकाळी घरी आल्यानंतर शुभ्रा साडीच्या झोपाळ्यावर झोके घेत होती. त्यावेळी झोपाळा गोल फिरल्याने साडीचा फास तिच्या गळ्याभोवती अडकला. झोपाळ्यावरून तिचे पाय खाली न टेकल्याने फास अधिक घट्ट आवळला गेला. हा प्रकार लक्षात येताच आजोबांनी आरडाओरडा केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत तिला तातडीने निपाणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय महात्मा गांधी रुग्णालयात ठेवण्यात आला होता. शुभ्राच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, आजी-आजोबा, चुलते व चुलती असा परिवार आहे. एका निष्पाप विद्यार्थिनीचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण कोडणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.