चिकोडी : शेजारील महाराष्ट्र राज्यातीर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी आणि निपाणी तालुक्यांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या कृष्णा नदीत १ लाख ३३ हजार क्युसेक इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याची आवक नोंदवली गेली असून नद्या पात्राबाहेर वाहू लागल्या आहेत.
महाराष्ट्रातील कोयना धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून धरणातून नदीपात्रात सुमारे ३३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सीमावर्ती भागातील कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत क्षणोक्षणी झपाट्याने वाढ होत आहे. नद्यांची पाणीपातळी वाढल्याने चिकोडी उपविभागांतर्गत येणारे ९ प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. उगार-कुडची पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आसपासच्या अनेक गावांचा एकमेकांशी असलेला रस्ते संपर्क तुटला असून नागरिक व वाहनचालकांचे हाल होत आहेत.
अलमट्टीत पाण्याची आवक वाढली
महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, अलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि कृष्णा नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे अलमट्टी धरणात सोमवारी सकाळी १ लाख २५ हजार ८५५ क्युसेक पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. सध्या धरणात ५१८.९४ मीटर पाणीपातळी असून एकूण १११.९६९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सध्या केपीसीएल आणि स्पिलवे गेट्सद्वारे १ लाख २८ हजार ३५० क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे.
पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने १ लाख ५० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पावसामुळे उत्तर कर्नाटकातील भीमा नदीलाही पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतः नदीपात्रात उतरू नये तसेच जनावरांनाही नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन्ही नद्यांमधील पाण्याचा प्रवाह अधिक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.